Women Safety: महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

समाजातील ही विकृती कशी रोखायची हा शासन, पोलीस तसेच संपूर्ण समाजापुढे आज प्रश्न आहे.
Women Safety In India
Women Safety In IndiaPudhari
Published on
Updated on

मुंबई: भोर तालुक्यातील नसरापूर येथे 65 वर्षांच्या नराधमाने 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. अत्यंत निंदनीय असेच हे कृत्य आहे. यापूर्वीही अल्पवयीन मुलींवर दोनदा त्याने अशीच कृत्ये करूनही न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले होते.

त्याचवेळी उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली असती व आरोपीला शिक्षा झाली असती तर ही घटना टळू शकली असती. पोलिसांनीही महिलांविरुद्धच्या प्रत्येक गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवणे गरजेचे आहे. समाजातील ही विकृती कशी रोखायची हा शासन, पोलीस तसेच संपूर्ण समाजापुढे आज प्रश्न आहे.

Women Safety In India
Mumbai Schools: पूर्व-प्राथमिक शिक्षणामुळे खासगी शाळांचे वर्चस्व

मुंबईतील साकीनाका येथे नुकत्याच एका निर्भयाला अत्यंत क्रूरपणे बलत्कार करून एका निर्जन ठिकाणी टाकण्यात आले व थोड्याच वेळाने बेशुद्धावस्थेतच तिचा मृत्यू झाला. ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर गेले अनेक महिने 30-32 तरुणांनी ज्यात काही अल्पवयीन मुलेही होती, बलात्कार केला.

अत्यंत उद्वेग निर्माण करणाऱ्या या अशा घटना केवळ पुणे, मुंबई, ठाणेपर्यंतच मर्यादित नसून सर्वच शहरांमध्ये, गावांमधे वारंवार घडल्याचे नजरेस येते. यातील अनेक पीडिता अल्पवयीन मुली आहेत.

सामाजिक माध्यमे जसे फेसबुक, व्हॉट्‌‍सॲप यांच्या मदतीने विश्वास निर्माण करणे, प्रत्यक्ष भेटीसाठी बोलावणे व त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, त्याचा व्हिडीओ तयार करणे, शस्त्रांचा धाक दाखवणे, ब्लॅकमेल करणे व अत्याचार चालू ठेवणे असे प्रकार उघडकीस येत आहेत. शारीरिक छळ करणे, वर्दळीच्या ठिकाणी छेडछाड काढणे याशिवाय मोबाईल, इमेल या माध्यमातून सायबर गुन्हे करणे याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

बहुतेक सर्व गैरप्रकार करण्यात ओळखीचे लोक, नातेवाईक, शेजारी हेच जास्तीत जास्त आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत व या व्यक्तींविरुद्ध तक्रार करायला पीडिता तयार होत नाहीत, पालक मुलीला तक्रार करू नये यासाठी दबाव आणतात, पीडिता हीच जणू काही दोषी आहे, अशी वागणूक समाजातून दिली जाते. हे ओळखून अल्पवयीन मुलींनी ओळख असलेल्या किंवा विश्वासू वाटणाऱ्या कोणत्याही पुरुषांबरोबर एकट्याने राहताना जास्तीत जास्त खबरदारी घेणे व विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्यास विरोध करणे आवश्यक आहे.

Women Safety In India
Missing Link Selfie Ban: कनेक्टिंग लिंकवर ‌‘सेल्फी‌’साठी थांबू नका; एमएसआरडीसीचे आवाहन

याशिवाय जर कोणी अतिप्रसंग करायला लागलाच तर 112 या भारत सरकारने आपत्कालीन मदतीसाठी सुरू केलेल्या ॲपच्या माध्यमून तत्काळ पोलीस मदत मिळवावी. याशिवाय सायबर टोलमुक्त हेल्पलाईन 155260 वर संपर्क करावा.

हा क्रमांक सकाळी 9 ते संध्याकाळी 6 उपलब्ध आहे. त्याशिवाय www.Cybercrime.gov.in यावर शारळश्र करावा. यात आपले नाव न लिहिताही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शासनाने बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 2 महिन्यांत दोषारोप पत्र पाठवणे बंधनकारक केले आहे व यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन केलेली आहेत.

छेडछाडीच्या घटनांमधे पीडितेचा जबाब व अन्य पुरावा एकत्र करून पोलिसांनी चोवीस तासांत दोषारोप पत्र पाठवणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. वेळच्यावेळेसच टवाळखोरांना न्यायालयातून शिक्षा झाल्यास बलात्कारासारखे पुढील गंभीर गुन्हे कमी होण्यास मदत होते. यासाठी न्यायाधीशांनीही कठोर भूमिका घेऊन आरोपींना दया न दाखवता शिक्षा करणे गरजेचे आहे.

त्यासाठी त्यांचेही वेळोवेळी प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे समाजात विश्वास उत्पन्न होईल. महिला पोलिसांनी आपल्या हद्दीतील महिला बचतगट सदस्या, महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शाळा व महाविद्यालयांतील मुलींसाठी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अथवा झूमसारख्या ॲपची मदत घेऊन जनजागृती करणे, महिलांमध्ये व अल्पवयीन मुलींमधे पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.

अत्याचाराचे बळी असणाऱ्या पीडितांशी संवाद साधून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास प्रोत्साहित करणे, न्यायालयात त्यांना खंबीर आधार देऊन सत्य सांगण्यास पाठिंबा देणे आवश्यक आहे, पोलिसांनीही महिला पोलीसमित्र ही संकल्पना राबवून, ज्या ठिकाणी पोलीस उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी महिला पोलीस मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलींशी संवाद स्थापन करणे जरुरीचे आहे.

समाजानेही या पीडितेंच्या बाबतीत आपला दृष्टिकोन बदलून त्यांना सतत मानसिक आधार मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे. महिलांची, मुलींची सुरक्षा ही आपली स्वतःची सुरक्षा आहे हे समजून त्यासाठी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. अल्पवयीन मुलांना एकटे न सोडता त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेणे प्रत्येक पालकाचेही कर्तव्य आहे. ही जबाबदारी पार न पाडणाऱ्या पालकांवरदेखील सौम्य स्वरूपात कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा गरजेची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news