

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) सेल्फीसाठी थांबू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
सेल्फी आणि फोटोसाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रीज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असून द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नाही. अपघाताचा धोका असल्याने वाहनचालकांनी हे प्रकार टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांना माहिती देणार,दंडाची आकारणी होणार
महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेगमर्यादा जाहीर केली आहे. बोगद्यात हलक्या मोटारीसाठी ताशी 100 किमी, बसेस व प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंकवरील दोन बोगदे व दोन पुलांवर 24 तास सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे.
देखरेखीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष आहे. द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या वाहनांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे. सेल्फी, फोटो आणि रील काढण्यासाठी थांबल्यास मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते.