

मुंबई : उपनगरीय पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नवीन लोकल आणि त्यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत अंधेरी, बोरिवली आणि विरार स्थानकांवर एकूण चार नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी केली जाणार आहे. यामुळे अंधेरी ते विरार दरम्यान ३० ते ४० अतिरिक्त लोकल चालवणे शक्य होईल. तसेच या स्थानकातील वाढती गर्दी नियंत्रणात ठेवणे रेल्वेला शक्य होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेवर विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या कामांचा थेट संबंध नवीन रेल्वे मार्गिका, यार्ड रिमॉडेलिंग आणि उपनगरीय लोकल सेवांच्या क्षमता वाढविण्याशी आहे. बोरिवली स्थानकात दोन नवे प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत, तर अंधेरी आणि विरार स्थानकामध्ये सुद्धा नवीन एक-एक प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे.
बोरिवली-विरार ५ वी व ६ वी मार्गिका प्रकल्पांतर्गत स्थानकातील प्लॅटफॉर्म, यार तसेच स्थानक इमारतीशी संबंधित कामांचा समावेश आहे. बोरिवली स्थानकात प्रस्तावित प्लॅटफॉर्म क्रमांक ३-ऐ हा होम प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करण्यात येत आहे. हा प्लॅटफॉर्म ३३० मीटर लांब आणि ७ मीटर रुंद असून, बोरिवलीच्या उत्तर दिशेकडील बाजूजूस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ च्या शेजारी प्रस्तावित आहे.
बोरिवली फलाट क्र. ३ च्या उत्तरेला ३३० मीटर लांब आणि ७ मीटर रुंद
अंधेरी आणि विरार येथेही पूर्वेकडे एक-एक नवा प्लॅटफॉर्म
दररोजचे प्रवासी
अंधेरी प्रवासी - ४,१८,५७७
बोरिवली प्रवासी - ४,४८,६४५
विरार प्रवासी - ५,८९,१९८