

Varanasi Thallium Poisoning Case: उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सपा नेते आणि व्यापारी संदीप सिंह यांना अतिशय घातक आणि दुर्मिळ विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू झाला आहे. या घटनेची तुलना अनेकजण सध्या चर्चेत असलेल्या Dhurandhar: The Revenge या चित्रपटातील कथेशी करत आहेत.
वाराणसीतील कोतवाली पोलीस ठाण्यात व्यापारी संदीप सिंह यांच्या पत्नी खुशबू सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2025 च्या अखेरीस गुरुग्राममध्ये संदीप यांची प्रकृती अचानक बिघडू लागली. सुरुवातीला ताप, पायांमध्ये मुंग्या येणे, शरीर दुखणे आणि उलट्या अशी लक्षणे दिसू लागली. पुढे परिस्थिती गंभीर होत गेली आणि न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण झाल्या.
प्रकृती खालावल्यामुळे संदीप सिंह यांना प्रथम दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी Guillain-Barre Syndrome (GBS) असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र स्थिती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. येथे करण्यात आलेल्या टॉक्सिकोलॉजी तपासणीत त्यांच्या रक्तात ‘थॅलियम’ नावाचे अत्यंत घातक विष आढळून आले.
थॅलियम हे अत्यंत दुर्मिळ, रंगहीन, गंधहीन आणि चवहीन विष असून त्याचा शोध घेणे अत्यंत कठीण असते. त्यामुळेच याला “पॉइजनर्स पॉइजन” असेही म्हटले जाते. सुरुवातीला याची लक्षणे साध्या न्यूरोलॉजिकल आजारांसारखी दिसतात, त्यामुळे वेळेवर निदान करणे अवघड होते.
या घटनेनंतर संदीप सिंह यांच्या भावाने मुंबईत ‘झिरो FIR’ दाखल केली होती. मात्र काही महिन्यांपर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. अखेर मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण तापले आणि वाराणसी पोलिसांकडे तपासासाठी पाठवण्यात आले.
यानंतर वाराणसीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1) अंतर्गत (हत्या करण्याचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत की हे विष नेमकं कधी आणि कशा प्रकारे दिलं गेलं. प्रवासादरम्यान, बैठकीत, रुग्णालयात की बाहेरच्या अन्नातून.
दरम्यान, संदीप सिंह यांच्यावर सध्या लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, थॅलियम विषबाधेमुळे सुरुवातीला मळमळ, उलट्या, शरीर दुखणे अशी लक्षणे दिसतात. मात्र गंभीर अवस्थेत श्वसनसंस्थेवर परिणाम होऊन जीवही जाऊ शकतो. त्वचेवर पुरळ, नसांमध्ये कमजोरी आणि केस गळणे ही त्याची प्रमुख लक्षणे मानली जातात.
ही घटना केवळ गुन्हेगारीच नव्हे तर अत्यंत नियोजित कट असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकरणाचा तपास आता सुरु आहे.