

पेण | पेण शहरातील म्हाडा कॉलनी जवळ असलेल्या शिक्षण महिला समितीच्या इंग्लीश मिडीयम स्कुल, गुरुकुल शाळेमधील विद्यार्थिनींच्या स्काऊट कॅम्पमध्ये पेट्रोल बॉम्बचा स्फोट घडवून आणल्याच्या आरोपावरुन पेण पोलिसांनी समीर नरदास पाटील रा.वढाव यास अटक केली आहे. कॅम्पमधील मुलींचा सुरु असलेला गोंधळ असह्य झाल्याने आपण हे कृत्य केल्याचे आरोपीने सांगितले आहे.
शाळेच्या मैदानावर तात्पुरते सहा टेंट (तंबु) उभारण्यात आले होते. कॅम्पचे सर्व कार्यक्रम पुर्ण झाल्यानंतर रात्री सुमारास सर्व विद्यार्थी, शिक्षक व स्टाफ गुरुकुल शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये झोपण्यास गेले होते. गुरुकुल शाळेचे वॉचमन यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ग्राउंड वर काहीतरी जळत असल्याचे दिसून आल्याने ती माहीती शिक्षक स्टाफ यांना देण्यात आली.
शाळेतील मैदानावर असलेल्या रात्रीच्या अंधाराला फायदा घेऊन कोणी अज्ञाताने पेट्रोल भरलेल्या बाटल्या टेंटवर (तंबु) टाकल्याने यात लागलेल्या आगीमध्ये सहा तंबूंपैकी एक तंबू पूर्णतः जळून खाक झाला होता. याबाबात पेण पोलीस ठाण्यात आज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक समद बेग व गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार विशाल झावरे आदी पथक करत असताना पेण पोलीस ठाणेकडील पथकाने घटनास्थळावरील, घटनास्थळाच्या मार्गावरील सुमारे 55 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, परंतु आरोपी याने गुन्हा करण्यासाठी छुप्या रस्त्याचा वापर केला असल्याने आरोपीत हा हाती लागत नव्हता गुन्हयातील साक्षीदारांची पडताळणी करुन, गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे अथक प्रयत्न करून कौशल्यपूर्वक तपासाचे आधारे 48 तासाच्या आत गुन्हा उघड केला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उप निरीक्षक समद बेग, सहा उप निरीक्षक राजेश पाटील, पोहवालदार सचिन व्हस्कोटी तसेच अजिंक्य म्हात्रे,संतोष जाधव,प्रकाश कोकरे,अमोल म्हात्रे,सुशांत भोईर, गोविंद तलवारे या पथकाकडून तत्परतेने तपास करण्यात आला.