

मुंबई: यूपीआयद्वारे दरमहा एक लाख रुपयांपपर्यंत स्वीकारल्यास त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, त्याहून अधिक रक्कम यूपीआयद्वारे आल्यास रस्त्यावरील लहान व्यावसायिकांना देखील ०.४ टक्के शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिली. त्यामुळे रोजची सरासरी चार हजार रुपयांची उलाढाल असणारा देखील एक लाखावरील रकमेसाठी शुल्क देण्यास पात्र ठरेल.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयवरील दोन हजार रुपयांवरील व्यवहारांवर मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) येत्या १५ ऑक्टोबरपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात पेट्रोल पंपचालकांसह विविध व्यापाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर एनपीसीआयने यूपीआयवरील शुल्क कसे असेल याची माहिती दिली. यूपीआयद्वारे पेमेंट करणे ग्राहकांसाठी यापुढेही मोफत राहणार आहे.
त्यांनी खरेदी केलेल्या इंधनाचीच किंमत अदा करावी लागेल, असे एनपीसीआयने म्हटले आहे. ग्राहकाने यूपीआयद्वारे दोन हजारपर्यंतचे पेमेंट केल्यास शून्य एमडीआर असेल. त्यावरील व्यवहारांवर अगदी अडीच, पाच आणि दहा हजार रुपयांच्या खरेदीसाठी पाच रुपये शुल्क द्यावे लागेल.
ग्राहकांवर भार टाकता येणार नाही ...
यूपीआय ग्राहकांसाठी मोफतच राहणार आहे. यूपीआयद्वारे कुटुंबीय आणि मित्रांना पैसे पाठवणे पूर्णपणे मोफत राहील. यूपीआयद्वारे कोणत्याही व्यापाऱ्याला कोणत्याही रकमेचे पेमेंट करणे मोफत राहील.
तुम्ही दुकानातून खरेदी करत असाल, स्थानिक बाजारात पेमेंट करत असाल किंवा रस्त्यावरील विक्रेत्याच्या क्यूआर कोडवर स्कॅन करून पेमेंट करत असाल ते मोफतच राहील. व्यापारी एमडीआरचा भार ग्राहकांवर टाकू शकत नाहीत.
व्यापाऱ्यांवर काय परिणाम होईल....
व्यापाऱ्यांना दोन हजार रुपयांपर्यंतच्या सर्व यूपीआय व्यापारी पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे ९६ टक्के व्यवहार मोफत राहतील. यूपीआय क्यूआर कोडद्वारे आपल्या बँक खात्यांमध्ये दरमहा एक लाख रुपयांपर्यंत रक्कम प्राप्त करणारे रस्त्यावरील विक्रेते, परिसरातील दुकानदार आणि लघु व्यावसायिक यांसारखे छोटे व्यापारी शून्य शुल्काचा लाभ घेत राहतील.
तर, दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पात्र व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क आकारले जाईल. तर, ७५ हजार रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी प्रति व्यवहार ३०० रुपये शुल्क आकारले जाईल.
शिक्षण, विमा, रेल्वे, पाणीपट्टीसाठी पाच रुपयांचे शुल्क
शिक्षण, विमा, रेल्वे, दूरसंचार आणि युटिलिटी सेवा (वीज, पाणी आणि पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू) यांसह इतर सेवांसाठी दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पेमेंटवर प्रतिव्यवहार पाच रुपये इतके निश्चित शुल्क आकारले जाईल.
पेट्रोल पंपावर स्थिर पाच रुपये निश्चित
पेट्रोल पंप चालकांना कमीत कमी आणि निश्चित यूपीआय पेमेंट स्वीकारता यावे यासाठी इंधन खरेदीवर सवलतीचे शुल्क लागूल करण्यात आले आहे. पंपावर दोन हजार रुपयांहून अधिक इंधन खरेदीसाठी केवळ प्रति व्यवहार पाच रुपये शुल्क आकारले जाईल. हा दर क्रेडिट, डेबिट आणि वॉलेटसारख्या इतर पेमेंट माध्यमांवर लागू होणाऱ्या शुल्कापेक्षा कमी असल्याचे एनपीसीआयने स्पष्ट केले आहे.