

कांदिवली: डीजिटलच्या जमान्यात पारंपरिक वाद्ये लोप पावत आहेत. मात्र त्याला छेद देत आजही काही कलाकारांनी पारंपरिक वाद्यांना पसंती देत आपली कला जीवंत ठेवली आहे.
त्यामुळे पारंपरिक वाद्यांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ढोल वादकांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांची ढोलकी वादनातून दिवसाची कमाई किमान २० ते ३० हजार रुपयांच्या घरात जात असल्याचे वादकांनी सांगितले.
दरम्यान, कांदिवली पश्चिमेला तीन नैसर्गिक विसर्जन तलावाच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर ढोलकी वादकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या ढोलकी वादकांची पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन सुरक्षित आणि उत्साहाने पार पडले.
सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी ढोलकी वादकांना पाचारण करण्यात आले होते. अत्याधुनिक वाद्यांवर बंदी घालण्यात आली असल्याने ढोलकी वादकांना मागणी वाढल्याने सुगीचे दिवस आल्याचे दिसून आले.
ढोलकी वादकांना मिरवणुकीसाठी तासाला १० ते १५ हजार रुपये बिदागी मिळत आहे. सध्या कांदिवलीत, मालाड , मालवणी, दहिसर आणि सांताक्रुझ येथून खारवा आणि काठीयावाडी समाजाचे तरुण ढोलकी वादक मोठ्या प्रमाणावर आपल्या समूहासह कांदिवलीत हजेरी लावतात.
एका समूहात बिदागी प्रमाणे वादक व ढोल ताशे असतात. भक्तांच्या सांगण्यावरून कोळी, नाशिक, पुणेरी, गुजराती गरबा आणि बांगडा असे विविध प्रकार वाजवावे लागत असल्याचे वादकांकडून सांगण्यात येत आहे. पुण्यावरून दोन पीक अप घेऊन अनंत येवले दरवर्षी येतात. त्यांच्या बिदागी ठरलेल्या आहेत.
भैरवनाथ तरुण मंडळ ४० वादक, २० ढोल, १४ ताशा आणि तीन लोखंडी घंटा, बिदागी प्रमाणे ग्रुप करून विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक ग्रुप किमान दोन, तीन बिदागी घेतो. दहा दिवसात किमान १० ते १२ लाख बिदगीतून मिळवितात, त्यांच्या कामानुसार वाटप करण्याची प्रथा पाळली जाते.
अशी असतात ढोलताशा पथके
कृणाल ढोली बाजा कांदिवली : १२ वादक, एक तासाचे १० हजार, ऑर्गन असेल तर १५ हजार
शिव तांडव कांदिवली : १२ वादक ड्रम सेट, ऑर्गन तर ताशा, ढोल तासाला किमान १८ हजार घेतात.
ए १ नाशिक ढोल सांताक्रुज: ६ ढोल तीन ताशा, एक तासाला १२ हजार.
श्री गणेश नाशिक ढोल मालाड: एका तासाचे १८ हजार १६ वाजंत्री ४ ताशे व ८ ढोल.