

Maharashtra Political Alliance
मुंबई : आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीच्या चर्चांनी शुक्रवारी पुढची पायरी गाठली. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असे विधान शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. युतीबाबतचे बारकावे आम्ही पहात आहोत. तुम्हाला थेट बातमीच देऊ, असे सांगत उद्धव यांनी मनसेसोबतच्या युतीची चर्चा आता चाचपणीच्या पातळीवर पोहचल्याचे स्पष्ट संकेत दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची तयारी दाखविली होती. त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर दोन्ही बंधूंच्या परदेश वारीने या चर्चांवर पुढे काहीच घडले नाही. आता महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येत राजकीय आघाडी उघडण्याची मागणी होत आहे. या संभाव्य युतीबाबत दोन्ही बाजूने सकारात्मक संकेत दिले जात असले तरी प्रत्यक्ष बोलणी घडत असल्याचे चित्र नव्हते. त्यावर, शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनीच युतीची चाचपणी सुरू असल्याचे म्हटले.
शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सुजाता शिंगाडे या शुक्रवारी स्वगृही शिवसेना ठाकरे पक्षात परतल्या. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत भाष्य केले.’ जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल. याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहत आहोत. तसेच मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक जे आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात काही संभ्रम नाही. त्यामुळे माझे म्हणणे असे आहे की संदेश वगैरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी दिवसभर ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाच्या चर्चेला उधाण आले.
आता तरी त्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मी योग्यवेळी बोलेन. मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. सध्या जे आहे त्यावर मी काय प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्यात? यांनी साद द्यायचीय आणि त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही हे ते ठरवायचे आहे. आता तरी त्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मी योग्यवेळी बोलेन. याविषयी उचितवेळी मी बोलेन.
शनिवारी सकाळी 9 वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी प्रमुख पदाधिकार्याची बैठक होत असल्याचे समजते. उध्दव ठाकरेंशी युती करण्याबद्दल आपल्या मनात असलेली नेमकी भूमिका राज या बैठकीत उघड करतील, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, ही युती होण्याची मनिषा सर्वप्रथम राज यांनीच बोलून दाखवली आहे.