

पुणे: ठाकरे कुटुंब एकत्र येत आहे, याचा मला आनंद आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. दुसर्याच्या आनंदात आनंद मानावा, हीच आपली संस्कृती आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्यास आनंद वाटणार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. माध्यमांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, राज ठाकरे म्हणाले आहेत की, ‘आमच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.’ ही त्यांची भूमिका माझ्यासाठी अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. योगायोगाने ती बातमी पाहिल्यानंतर मी दोघांनाही संपर्क साधला. माझ्या अंगावर काटा आला. ही अत्यंत आनंदी आणि समाधानीची गोष्ट आहे. आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पाच ते सहा दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत.
आमच्या पवार कुटुंबाला उद्धव आणि राज दोन्ही भाऊ तेवढेच प्रिय आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील, तर राजकीय आणि कौटुंबिक इतिहासातील हे सोनेरी दिवस असतील. दोन बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील, तर आपण मनापासून त्यांचे स्वागत केले पाहिजे.
अहवाल काय म्हणतो, यात अडकू नये
तनिषा भिसे प्रकरणाबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या, या प्रकरणातील अहवाल म्हणजे दीनानाथ रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, ते दुर्दैवी आहे. परंतु, महाराष्ट्रातील कोणत्याही मुलीवर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही याबाबत न्यायालयातही धाव घेतली आहे.
हा काही राजकीय विषय नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी जे वक्तव्य केले होते, त्याबाबत माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या की, मुख्यमंत्री आपल्या मुलीला न्याय देतील. मात्र, पहिल्या दिवसाच्या आणि आजच्या त्यांच्या वक्तव्यात मोठा फरक आहे, हे दुर्दैवी आहे. आता अहवालात न अडकता सत्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अहवाल काय म्हणतो, यात अडकून राहू नये, असेही सुळे म्हणाल्या.