

Maharashtra Politics
मुंबई : मनसेने आतापर्यंत अनेकांबरोबर युत्या केल्या किंवा केल्या नाहीत. त्यासाठी प्रस्ताव दिले किंवा घेतले असे आमच्या निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसेमधील युती ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही. हा प्रस्तावाचा खेळ नाही आहे. कारण राज ठाकरे यांनीच युतीची भूमिका मांडली असून त्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्क प्रतिसाद दिलेला आहे, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना (ठाकरे) व मनसे या दोन पक्षांची युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण युतीची चर्चा अजूनही सुरू झालेली नाही. यासंदर्भात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मनसेसोबत युतीसाठी शिवसेनेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आता राज ठाकरे यांनी निर्णय घ्यावा, असे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेने योग्य तो प्रस्ताव पाठवावा, आम्हीदेखील युतीसाठी सकारात्मक आहोत, अशी प्रतिक्रिया मनसेने गुरुवारी दिली आहे.
यासंदर्भात पत्रकारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाने एक भूमिका मांडली आहे आणि आपण कुठल्याही प्रकारची नकारात्मकता भूमिका न घेता त्याकडे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबईच्या हितासाठी सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे, असा विचार उद्धव ठाकरेंनी आमच्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही.
युतीची बोलणी कधी होईल आणि त्याची सुरुवात कोणाकडून होईल, असे पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आहेत आणि ते नेतेही आहेत. या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा व्हायला हवी. पण त्या चर्चेची मीडियाला योग्यवेळी कल्पना देण्यात येईल.