MLC polls | विधान परिषदेचा सामना टाय! 'महायुती', 'महाविकास'ला प्रत्येकी २ जागा, आता पुढील लक्ष...

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील ४ जागांसाठीचे निकाल जाहीर
MLC polls
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत.PTI

पुढारी ऑनलाईन डेस्क

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील (MLC polls) ४ जागांसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत. विधान परिषदेच्या ४ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागांवर ठाकरे गटाने बाजी मारली. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर चुरशीच्या लढतीत विजयी झाले आहेत. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी विजय मिळवला. तर कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅटट्रिक केली. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत.

मुंबई पदवीधर- ठाकरेंच्या अनिल परब यांची बाजी

मुंबई पदवीधर निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा पराभव केला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात जोरदार लढत झाली. या चुरशीच्या लढतीमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांनी पदवीधर संघामधून ४४ हजार ७८४ मतांनी विजय मिळवला.

MLC polls
मुंबईत मराठी लोकांसाठी 50% घरे आरक्षित ठेवा! : अनिल परब

'मुंबई शिक्षक'मध्ये ठाकरे गटाचे अभ्यंकर विजयी

तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर चुरशीच्या लढतीत विजयी झाले आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात पंचरंगी सामना झाला. येथे भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदे सेनाचे शिवाजी शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवाजी नलावडे यांना मागे टाकत उद्धव सेनेचे ज. मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीला पराभव पत्करावा लागला.

MLC polls
मुंबई शिक्षक मतदारसंघातून चुरशीच्या लढतीत अभ्यंकर विजयी

कोकणमध्ये डावखरे यांची हॅटट्रिक

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत झाली. येथे भाजप महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅटट्रिक केली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. इथे भाजपने विजय मिळवला आहे. विद्यामान आमदार निरंजन डावखरे यांनी विजयाची घौडदौड कायम राखत विजयी हॅटट्रिक मिळवली आहे.

MLC polls
कोकण पदवीधर निवडणूक: डावखरे यांची विजयाची हॅटट्रिक

'नाशिक शिक्षक'मध्ये किशोर दराडे यांचा विजय

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर शिंदेंच्या शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा विजय झाला. त्यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव केला. या मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विजयी होणारे दराडे हे पहिलेच उमेदवार ठरले आहे. दराडे यांना २६ हजार ४७६ मते मिळाली. अपक्ष विवेक कोल्हे यांना १७ हजार ३७२ मते मिळाली. तर शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना १६ हजार २८० मते मिळाली. दराडे ९ हजार २०४ मताधिक्याने विजयी झाले.

MLC polls
Nashik Teachers Constituency | ब्रेकिंग ! नाशिक शिक्षकमध्ये किशोर दराडे विजयी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news