

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचारासाठी रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरले होते. रविवारी सुट्टीचा मोका साधत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नेत्यांनी राज्यभरात मैदान पिंजून काढले.
भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिवसभर विदर्भात प्रचाराचा सपाटा लावला. एकाच दिवशी त्यांनी पाच ठिकाणी सभा घेतल्या. चंद्रपूर, अमरावती येथे रोड शो, तर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा घेतली. त्यानंतर थेट मुंबई गाठत कांदिवली विभागातही दोन सभा घेतल्या.
शिवसेना ‘उबाठा’चे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत प्रचारसभा सुरू केल्या आहेत. रविवारी या दोन नेत्यांनी आपला संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला. परंतु, अद्याप त्यांनी राज्यात दौरे सुरू केले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे बुधवारपासून आपल्या प्रचार सभांना सुरुवात करणार आहेत, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त नंदुरबारला होते. ते सोमवारपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरपालिकांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या दोन्ही शहरांमध्ये त्यांनी विविध माध्यमांतून मतदारांशी संपर्क साधला. तर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण धुरा त्यांनी नवाब मलिक यांच्यावर सोपविली आहे. मलिक यांनी काही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिक, मालेगाव, धुळे आणि जळगाव येथे मेळावे आयोजित करून कार्यकर्त्यांना प्रचार जोमाने करण्याच्या सूचना केल्या, तर पक्षाचे निवडणूकप्रमुख महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूरमध्ये सभा घेऊन पालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याचे आवाहन केले.
सर्व पालिकांच्या निवडणुकांसाठी 33 हजार 427 जणांनी नामांकन सादर केले होते. शुक्रवारी 8 हजार 840 जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता 15 हजार 931 उमेदवार रिंगणार राहिले आहेत. यामध्ये अपक्षांचा मोठा भरणा आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत 2 जानेवारी होती. त्यानुसार प्रचारासाठी हा पहिलाच रविवार होता. ही संधी साधत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रचार सभांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी साहित्य संमेलनानिमित्त साताऱ्यात होते. 6 जानेवारीपासून ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत. जळगाव, धुळे, अकोला, अमरावती, अहिल्यानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, नाशिक, मालेगाव, संभाजीनगर, जालना, नांदेड आणि परभणीमध्ये त्यांच्या जाहीर सभांचे नियोजन आहे, तर प्रत्येक दिवशी संध्याकाळी एमएमआर क्षेत्रात रॅलीच्या माध्यमातून ते मतदारांशी संपर्क साधणार आहेत.