

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल २० वर्षांनंतर दादर येथील शिवसेना भवनाला भेट दिली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, इतक्या वर्षांनंतर येथे आल्यावर २० वर्षांनी जेलमधून सुटून आल्यासारखे वाटत आहे.
आज (दि. ४) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त वचननामा प्रकाशित केला. यावेळी गाडीतून उतरल्यानंतर सर्वच पत्रकारांनी त्यांना शिवसेना भवनात २० वर्षांनी आल्यानंतर कसं वाटलं? असा प्रश्न विचारला. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला संजय राऊत यांनीही 'राज २० वर्षांनी शिवसेना भवनात आले आहेत' असा उल्लेख केला.
यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "नवीन शिवसेना भवन पहिल्यांदाच पाहत आहे. मला आता २० वर्षांनी तरुंगातून सुटून आल्यासारखं वाटतंय. जुन्या शिवसेना भवनच्या वास्तूशी माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत, त्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. आता इथे नक्की कुठे काय होतं, हेच मला आठवत नाहीये."
यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना भवनाच्या इतिहासातील एका घटनेला उजाळा दिला. १९७७ साली जेव्हा शिवसेना भवन बांधले गेले होते, त्या काळात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी शिवसेना भवन सोबत असलेल्या आपल्या जुन्या नात्याची आठवण करून दिली. "१९७७ साली शिवसेना भवन झाले तेव्हा जनता पक्षाचे सरकार आले होते. तेव्हा शिवसेना भवनावर दगडफेक झाली होती. अशा अनेक आठवणी आहेत. त्या आठवणीत मी रमत नाही”, असे ते म्हणाले.