

महाराष्ट्रात आज जे राजकारणात येऊ इच्छितात, त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे.
Uddhav-Raj Thackeray joint press conference
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (दि. 4) शिवसेना भवन येथे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी दोन शब्दांमध्ये विषय संपवला.
यावेळी राज ठाकरे यांना विचारणा झाली की, शनिवारी वरळीमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा वारसा कोण चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. यावेळी ते एकनाथ शिंदे यांना ढाण्या वाघ असेही म्हणाले. यावर तुम्हाला काय वाटते? यावर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत एवढंचम्हणाले की, मी हसलो ना आता, मी तर शांतपणे हसलो, संजय राऊत जोरात हसले, हेच त्याचे उत्तर. एवढ्या दोन शब्दांमध्ये त्यांनी फडणवीसांनी एकनाथ शिंदेवर उधळलेल्या स्तुतिसुमनांचा विषय संपवला.
तत्पूर्वी राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, पश्चिम बंगाल राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. याविरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता याच पक्षाचे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याबाबत काय म्हणणं आहे. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत, तर महाराष्ट्रात तुम्ही निवडणुका बिनविरोध कशा करता, असा सवालही त्यांनी केला.
आता तुम्ही सत्तेत आल्यानंतर काँग्रेस पक्षाने असं केले म्हणून आम्ही तसे करत आहोत, असे तुम्ही म्हणत आहात. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच आलेले नाही, उद्या तुम्ही सत्तेतून जाल. तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत, त्याच्या दामदुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल, तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी भाजपवर केला.
उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार करत आहेत. महाराष्ट्राचे अशा प्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात आज जे राजकारणात येऊ इच्छितात, त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. या सर्व गोष्टींचा विचार राजकीय पक्षांनी करणे गरजेचे आहे, असेही राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.