

Uddhav-Raj Thackeray Manifesto
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्त वचननामा प्रकाशित केला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार, असा निर्धार त्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या वचननामावर भाजपने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाचे मॉडेल उद्धव ठाकरे कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. फडणवीस यांनी मुंबईचे २०४७ चे व्हिजन तयार केले असून महायुती आणि त्यांच्यावर मुंबईचा विश्वास आहे. उद्धव ठाकरेंवर मुंबईकर विश्वास ठेवणार नाहीत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासने खोटी आहेत. दिलेली आश्वासने ते पूर्ण करणार नाहीत. कधीच पूर्ण होणार नाहीत अशी आश्वासने त्यांनी दिली आहेत. २५ वर्ष महापौर पदावर राहून ते मुंबईला पुढे नेऊ शकले नाहीत. मुंबईला पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना यावे लागले, अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली.
ठाकरेंना विकासाचं घेणं देणं नाही, त्यांना खोट्या बातम्या पेरायच्या आहेत. त्यांना मुंबईत निगेटिव्ह प्रचार करून निवडणूक लढवायची आहे. पण मुंबईची जनता विकासाच्या मागे उभी आहे. मुंबईत भाजपा महायुतीचा महापौर होईल. राज ठाकरेंना देखील निगेटिव्ह मत मागायची आहेत, निगेटिव्ह बोलायचं आहे, असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवारांनी काल टीका टिपण्णी करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या, असेही बावनकुळे म्हणाले. मित्र पक्षात खडा पडेल असे वक्तव्य त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.