रमाकांत मुकादम
Ramdas Boat 1947 : भारतीय सागरी दुर्घटनेत रामदास जलसमाधी सर्वात मोठी दुर्घटना समजली जाते. जवजवळ 625 जणांना यात जलसमाधी मिळाली होती. प्रलंकारी तांडवापुढे घोंघावणारी रामदास सागरमय झाली. 17 जुलै 2024 रोजी या घटनेस 76 वर्षे होत आहेत, त्या दुःखद स्मृतींचा घेतलेला परामर्ष.
स्थळ भाऊचा धक्का, 17 जुलै 1947 चा दिवस नेहमीसारखाच उजाडला होता. मात्र धक्क्यावर गटारी अमावस्येनिमित्त गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची अधिक गर्दी होती. बाजारहाटीच्या तसेच गोडधोडसामानासह चाकरमानी बोटीस शिरत होते. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कॅप्टनने घंटी वाजवून बोट धक्क्यावरून सोडण्याची सूचना केली. खलाशांनी तत्परते शिडी काढली.अन् भोंगा वाजला. धक्क्यापासून समांतर वळण घेताना पंख्याच्या फेसाळणार्या गिरक्याने समुद्रीस्वाराला रामदास निघाली.पावसाची रिपरिप चालूच होती. अरबी समुद्राच्या अथांगात तिचे मार्गक्रमण चालू होते.
संध्याकाळी गटारीमुळे एकत्र येणार्या आप्तांच्या हुरहुरीने अनेक प्रवासी गुजगोष्टी करीत नेहमीचा समुद्री लाटांचे तुषारीही रिजवत होते. मात्र अर्ध्या तासानंतर काळ्याकुट्ट ढगांनी आसमंत व्यापू लागले होते. प्रलंयकारी लाटांचे तांडव वाढत होते. कॅप्टन इब्राहीम सुलेमान नि सहकार्यांनी निसर्गाचे औदार्य लक्षात घेता बोट पिरवाडी किनार्याकडे घालण्याचे प्रयत्न करत होते, परंतु लाटांच्या तांडवापुढे रामदासचा वेग थिटा पडून ती जणू हिंदोळ्यावर डोलत होती.लाटांच्या तडाख्याने बोटीवरील ताडपत्र्या कुचकामी झाल्याने प्रवासी सैरभैर होऊ लागले.
बोट कर्मचारी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु प्रलंयकारी यम साक्षात दिसू लागल्याने त्यांच्या जीवांचा आकांत सुरू होता.30-40 फुटी लाटांच्या तांडवावर रामदास झुलक्या मारत होती. लांटाच्या चौफेर मार्याने प्रलयंकारी लाटांच्या तांडवाने जणू चुंभाटच तेथे संचारला होता. महाप्रलयाच्या जबड्यातच ती शिरली होती. फूलफोर्सने घोंघावणारी रामदास आक्राळविक्राळ लाटांची कळसुत्री झाली होती. अन् एका जबरदस्त लाटेने कललेल्या रामदासला गिळंकत केले.
रामदासरुपी मानवी विजयवंताचा अहंकार त्या रौद्र लाटांच्या तांडवाने गिळंकृत केला होता. या तांडवाचा एकमेव साक्षीदार काशाचा खडक निस्सीमतेन पहात होता. अरबी समुद्र-पिरवाडी-द्रोणागिरी पर्वतरांग आणि धरमतर खाडीने निर्माण केलेला हा ट्रँगल आजही सारंगांना हुलकावणी देत आहे हेच तर त्याचे आश्चर्य आहे. त्या दिवशी सकाळी 9 वा. ही दुर्घटना घडली. एरव्ही मासेमार्यांच्या छोट्या होड्याही मासेमारी करण्यासाठी पिरवाडी परिसर काशाखडक व्हाया नवखार किनारा पिंजून काढतात. मात्र निसर्गाचा फेरा काय तो येथेच समजतो.
खरे तर इंग्लंडच्या स्कॉटलँड यार्डात रामदासची बांधणी 1936 मध्ये केली. 179 फूट लांब व 29 फूट रुंद आणि 406 टन वजन क्षमता अशी तिची बांधणी. विशेषत दुसर्या महायुद्धात सैन्यवाहतुकीसाठी तिचा वापर हा उद्देश होता. परंतु 1945 युद्ध समाप्तीनंतर हे जहाज इंग्लंडने भारतीय बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीस विकले. भारतीय सागरी मार्गावर कोकणात या बोटीने प्रवासी वाहतूक केली जात असे. या जहाज श्रेणीतील संत तुकाराम, जयंती ही जहाजे 1927 दरम्यान कोकण प्रवासात बुडाली. तर रामदास 17 जुलै 1947 रोजी अमावस्या-उधाणाची भरती आणि पावसाळी वादळाने या ट्रँगल प्रदेशात बुडाली.
मुंबई भाऊच्या धक्क्यापासून 8 सागरी मैल तर पिरवाडी- रेवस धक्क्यापासून 4 मैल अंतरावरील काशाच्या खडकाजवळ ही दुर्घटना घडली. त्या दिवशी रेवस येथील कोळीबांधवांनी आदल्या दिवशी पकडलेले मासे मुंबई-ससून डॉक येथे विक्रीसाठी सकाळी 9 च्या दरम्यान निघाले होते परंतु काशाच्या खडकाच्या आसपास गेले असतील तो आसमंत काळ्याकुट्ट ढगांनी व्यापला होता. प्रलंकारी पावसाचे वातावरणातील रंग ओळखून त्यांनी आपले मचवे पुन्हा रेवस बंदरी आणले. त्यानंतर आकाशरंग स्वच्छ होताच त्यांनी पुन्हा आपले मचवे ससून डाकच्या दिशेन स्वार केले.
परंतु, काशाच्या खडक परिसरात येताच तेथे समुद्रात पोहणारी माणसे पाहून इथे काहीतरी विपरीत घडल्याचे लक्षात आले. रामदास बोटीला जलसमाधी मिळाल्याचे समजले. त्यांनी हजारोे रुपयांची मासळी समुद्रात फेकून त्या माणसांना वाचविले. जवळ जवळ 70 पेक्षा अधिक माणसे घेऊन हे कोळीबांधव दु. 1 वाजता रेवस बंदरी पोचले. परंतु येथील तारयंत्रानी खबर देण्यास उशीर केला. सायंकाळी 6 वा. ही खबर मुंबईला समजली. मात्र फलकाटाल पकडून लाटा झेलत एकमेव बारक्या मुकादम या केवळ 10 वर्षांच्या मुलाने पोहत दु.3 वा. ससून डाक गाठले. अर्थात पोर्ट ट्रस्टच्या बोटीने त्यास हटकल्याने रामदास दुर्घटनेची बातमी प्रथम मुंबईला पोचली.
त्यानंतर बोट कंपनीने दोन बोटी बचावासाठी सोडल्या. तोपर्यत खेळ संपला होता. जवळपास 20-25 जणाना पिरवाडी किनारी फिरण्यास आलेल्या मुस्लीम तरुणांनी समुद्रात उड्या टाकून वाचविले. तर कोंडाजी नावाच्या वारकर्यानेे करंजा बंदर गाठले. कंपनी बोटीने वाचवलेल्या प्रवाशांना दवखान्यात ठेवले मात्र त्यांना कुणाशी बोलण्यास मज्ज्जाव केला होता. या दुर्घटनेत जवळपास 630 जणांना जलसमाधी तर 225 वाचले होते. त्यातच बोटीचा कॅप्टन इब्राहीम सुलेमान यासह बरेच खलाशी वाचल्याने दुर्घटनाग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबांनी बोटीच्या कार्यालयावर धडक देत प्रश्नांची सरबत्ती केली होती.