

पेण तालुक्यात दारूची अवैधरीत्या विक्री केली जात असुन अनेक हॉटेल्स आणि चायनिज सेंटरमध्ये अनधिकृतरीत्या दारू विक्री आणि व्यवसाय सुरु झाला आहे. दरम्यान या वाढत्या अवैध विक्री आणि व्यवसायामुळे तालुक्यातील तरुणाईमध्ये वाद होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे रायगड राज्य उत्पादन शुल्क विभाग या व्यावसायिकांकडे कशा प्रकारे लक्ष देते हे पहावे लागेल.
पेण तालुक्यात जेवढे अधिकृत बियर शॉप, वाईन शॉप आणि बार रेस्टॉरंट आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने अनधिकृत दारू विक्री आणि व्यवसाय करणारी हॉटेल्स, चायनिज सेंटर यांमध्ये वाढ झाली आहे. अशा अवैधरित्या व्यवसाय करणार्या व्यावसायिकांवर खरे पाहता दंडात्मक करवाई होणे अपेक्षित असताना या व्यावसायिकांवर कारवाई तर होत नाहीच याउलट या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याने या ठिकाणी मद्यापिंचे वाद होऊन नको ते प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर करवाई करण्याची मागणी आता पेण तालुक्यातील सामान्य नागरीक करत आहेत.
पेण तालक्यात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसची निर्मिती झाली आहे. या फार्म हाऊसच्या माध्यमातून फार्महाऊस मालकाला उत्पन्न जरी मिळत असले तरी त्या मालकांकडून नियमांचे किती पालन केले जाते याचे कोणतेही संबंधित अधिकारी तपासणी करताना दिसून येत नाहीत. जे ग्राहक येतात ते पैसे देऊन येत असल्याने नियम पाळणे हे मालकाचे कर्तव्य असताना देखील कोणत्याही प्रकारचे नियमांचे पालन न करता सर्वच फार्म हाऊसवर अनधिकृतपणे दारु विक्री केली जाते. एवढेच नव्हे तर एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला, सण उत्सवाला किंवा पारंपरिक जतन केल्या जाणार्या हळदी समारंभाला लाऊड स्पीकर परवानगी घ्यावी लागते, मात्र या फार्म हाऊसवर मोठमोठ्या आवाजात डीजच्यिा तालावर चालणार्या पार्ट्यांना या परवानग्या का घ्याव्या लगत नाहीत आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का असा सवाल केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी जिथे जिथे अनधिकृतपणे दारु विक्री किंवा इतर व्यवसाय चालू आहे, त्या ठिकाणी आमच्या करवाई सुरु आहेत, मात्र येत्या आठवड्यात आम्ही पुन्हा एकदा विशेष करून पेण तालुका हद्दीतील सर्व हॉटेल्स आणि चायनिज सेंटर या ठिकाणी जाऊन धडक कारवाईची मोहीम राबविणार आहोत आणि त्याचा कारवाईचा अहवाल आपल्याला प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिला जाईल.
रविकिरण कोले, अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क.