

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुदतपूर्व सुवर्ण रोखे वटविण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आठ वर्षे मुदतीचे रोखे पाच वर्षांतच वटवता येतील. गुंतवणूकदारांना एक लाखाच्या गुंतवणुकीपोटी 2.7 लाख रुपये मिळतील.
रोखे दिल्यानंतर पाच वर्षांनी संबंधितांना वटविता येतात. सार्वभौम सुवर्ण रोख्यांची 2020-21 ची नववी आवृत्ती आता मुदतपूर्व वटण्यास पात्र झाली आहे. या आवृत्तीतील रोख्यांची प्रतिग्रॅम किंमत पाच हजार रुपये होती. ऑनलाईन रोखे घेणाऱ्यांना प्रतिग्रॅम 50 रुपयांची सवलत देण्यात आली होती.
या आवृत्तीतील रोखे 5 जानेवारीपासून वटविता येणार आहेत. त्यांची किंमत प्रतिग्रॅम 13,381 इतकी असेल. म्हणजेच पाच वर्षांत या रोख्यांची प्रतिग्रॅम किंमत 8 हजार 431 रुपयांनी वाढली आहे. टक्क्यांमध्ये ही वाढ 170.32 होते.
याशिवाय सुवर्ण रोख्यांच्या मूळ रकमेवर अडीच टक्के वार्षिक व्याज दिले जाते. सार्वभौमिक सुवर्ण रोखे ही योजना आरबीआय सरकारच्या वतीने राबवत असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने जाहीर केलेल्या शेवटच्या तीन व्यावसायिक दिवसांच्या सरासरीवरून दर निश्चित केले जातात.