

मुंबई : रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भारतावर शुल्कवाढ (ट्रम्प टॅरिफ) लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेवर अवलंबून असलेल्या आयटी कंपन्यांच्या शेअर भावात सोमवारी घसरण झाली. परिणामी, सेन्सेक्स 322 आणि निफ्टी निर्देशांक 78 अंकांनी खाली आला.
मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स 0.38 टक्क्याने घटून 85,439 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी निर्देशांक 0.30 टक्क्याने घटून 26,350 अंकांवर आला. एचडीएफसी, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर भावात एक ते दोन टक्क्यांची घसरण झाल्याने सेन्सेक्सचे नुकसान झाले. मिड कॅप निर्देशांकात 0.2 टक्क्याची घट झाली असून, स्मॉल कॅप निर्देशांकात 0.5 टक्क्याने वाढ झाली.
डॉलरची मागणी वाढल्याने सोमवारच्या सत्रात रुपया कमकुवत झाला. एका डॉलरचा भाव 90.27 रुपयांवर आला आहे. गत सप्ताहाच्या तुलनेत रुपया सात पैशांनी खाली आला आहे. गत महिन्यात 16 तारखेला डॉलरच्या भावाने 91.02 ही नीचांकी पातळी गाठली होती.