Sion Hospital CT Scan MRI: सायन रुग्णालयात आरोग्य सेवांचा बोजवारा! सीटी स्कॅन-एमआरआय ठप्प, डायलिसिस मशीन धूळखात
रुग्णांना चार ते पाच महिन्यांच्या तारखा
रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीनपैकी एक मशीन गेल्या 10 महिन्यांपासून खराब आहे. दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गैरसोय होत आहे.
एमआरआय मशीनचीही अशीच अवस्था असून दोनपैकी फक्त एकच मशीन कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णांना चार ते पाच महिन्यांच्या तारखा दिल्या जात आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. सायन रुग्णालयात सहा महिन्यांपासून एक्स-रे फिल्म्ससारख्या अत्यावश्यक साहित्याचाच तुटवडा असल्याने रुग्णांना मोबईलवर फोटो बाटवत आहेत. सीटी-स्कॅन, एमआरआय मशीन नादुरुस्त आहे. तर डायलिसिस मशिन धूळखात पडले आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना मोबाईल फोनवर एक्स-रे इमेजेस देण्यात येत आहेत. आम्हाला मोबाईलवर एक्स-रे दिल्यानंतर डॉक्टरकडे दाखविण्यासाठी गेलो असता फ्रॅक्चर नेमके कुठे आहे हे दिसत नाही. निदान करणे अशक्य असल्याने खासगी केंद्रात एक्स-रे करण्याचा सल्ला दिल्याचे रूग्ण अशरफ अली यांनी सांगितले. सायन रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये गंभीर अपघाती रुग्ण दाखल होतात, पण त्यांनाही एक्स-रे फिल्म्स मिळत नसल्याचे वास्तव आहे.
सायन रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर मूत्रपिंडाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र वॉर्ड क्रमांक 35 मध्ये बसवलेल्या 10 डायलिसिस मशीन बंद आहेत. तंत्रज्ञांच्या कमतरतेमुळे या मशीन धूळ खात पडून असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने मशीन चालविण्यासाठी टीम नियुक्त केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात डायलिसिस सुविधा फक्त आपत्कालीन रुग्णांसाठीच मर्यादित राहिली आहे. रुग्णांना तीन ते चार तास रांगेत थांबावे लागत आहे. एका तंत्रज्ञाची कंत्राटी नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्याला सेवेतून काढून टाकल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे.
बाहेरून आवश्यक साहित्य उपलब्ध करून रुग्णांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डायलिसिस आणि सीटी स्कॅन मशीनबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. अतिरिक्त उपकरणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
शरद उघडे, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका

