

मुंबई: दोन महिन्यानंतर पहिल्यांदाचा मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 101 वर आल्याने बुधवारचा दिवस मुंबईकरांसाठी मोकळा श्वास घेणारा ठरला. या काळातील हा सर्वात कमी एक्यूआय होता.
29 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एक्यूआय हा 151 ते 200 दरम्यान राहिला. या काळात श्वास घेणेही कठिण होत होते. याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत होता. श्वसनाचे विकार वाढले होते. या अतिदूषीत हवेची दखल उच्च न्यायालयानेही घेतली होती. वेळोवेळी सुनावणी घेत महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले होते. समिती स्थापन करून उपाययोजना न झाल्यास थेट कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र मुंबईची हवा काही सुधारत नव्हती.
गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा चढू लागल्यानंतर वायू प्रदूषणात घट होत गेली. 21 दिवसांनंतर हवा गुणवत्ता निर्देशांक बुधवारी शंभरपर्यंत (101) घसरला. मंगळवारच्या तुलनेत 50ची घट म्हणजे शहर आणि उपनगरांमधील हवा सुधारल्याचे चित्र आहे. जवळपास 45 ठिकाणचे वायू प्रदूषण मध्यम कॅटेगरीमध्ये होता. त्यामुळे मागील दोन महिन्यांच्या तुलनेत नागरिकांनी थोडा मोकळा श्वास घेता आला.
नवी मुंबईतही गेल्या दोन महिन्यात वायू प्रदूषण समस्या गंभीर होती. बुधवारी सरासरी एक्यूआय हा 118 वर होता. त्यामुळे नवी मुंबईकरांनाही दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईत सानपाडा 97, बेलापूर 122, पामबीच 115, घणसोली 104 नेरुळ 122 तर पनवेल 119 इतका एक्यूआय होता.
वायू प्रदूषणासह मुंबईतील तापमानही घसरले. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावरील माहितीनुसार, सांताक्रुझ वेधशाळेमध्ये बुधवारी किमान 21 आणि कमाल 30 अंश सेल्सिअस तापमान होते. मंगळवारच्या (21/32 अंश सेल्सिअस) तुलनेत कमाल तापमानात दोन अंशांनी घट झाली. गुरुवारपासून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.