

Who is Sarang Arun Lakhani: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती यांचा विवाह ठरला असून त्या सारंग लखानी यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत. याबाबतची स्मृती शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. सारंग अरूण लखानी हे नागपूरचे असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांची लाडकी लेक नागपूरची सून होणार आहे.
शरद पवार यांची नात रेवतीच्या विवाह जुळवण्यात नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची देखील चर्चा सुरू आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सारंग हे चांगले बॅडमिंटनपटू देखील असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरूण लखानी यांचे पुत्र आहेत.विश्वराज ग्रुप ही नागपूरची कंपनी असून ती सांडपाणी प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन यासारखे प्रकल्प हाताळते. ही कंपनी जल व्यवस्थापनात कार्यरत आहे.
रेवती आणि सारंग यांचा विवाह कधी होणार याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र रेवती आणि सारंग यांचे अभिनंदन करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहेत. सुप्रिया सुळे यांची मैत्रीण स्मृती शिंदे यांनी सारंग आणि रेवती या दोघांचे फोटो शेअर करून अभिनंदन केलं आहे.
रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांना रेवती आणि विजय सुळे ही दोन मुलं आहेत. रेवती यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे. त्या आपल्या आईच्या प्रचारात देखील सक्रिय होत्या. त्यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत आपल्या आईला मदत केली होती.