

Sharad Pawar Health Update
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे आणि नातू रोहित पवार हेही दाखल झाले. डॉ. सायमन ग्रँट पवार यांच्यावर उपचार करत आहेत. पवार यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
प्राथमिक तपासणीत हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी स्थिर आहे. मात्र, श्वसन वेग काहीसा वाढलेला असल्याचे समजते. पवार यांना एखादा दिवस रुग्णालयात ठेवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत, अशा स्वरूपाचा सुप्रिया सुळे यांचा डॉक्टरांशी संवाद झाला.
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची प्राथमिक तपासणी झाली आहे. सध्या ऑक्सिजन पातळी, हृदयगती सामान्य असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसातील सततच्या धावपळीमुळे त्यांना थकवा आला आहे. छातीत थोडा कफ असल्याने श्वसन तपासणीही करण्यात आली आहे. पवार यांना सध्या प्रायव्हेट रूममध्ये ठेवण्यात आले असून ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरची गरज भासलेली नाही. पुढील तपासण्यांचे अहवाल दोन-तीन तासात हाती येतील. त्यानंतर पवार कुटुंबीयांकडून पुढचा निर्णय घेतला जाईल.
रोहित पवार म्हणाले, 'गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये शरद पवार यांची खूप धावपळ झाली आहे. शारीरिक थकवा आल्यामुळे आणि श्वास घेण्यास थोडासा त्रास झाल्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्या खाजगी वाहनातून दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून अहवाल सामान्य आले आहेत. मी स्वतः डॉक्टरांशी बोललो आहे. पवार यांच्यावर रुग्णालयाच्या प्रोटोकॉलप्रमाणेच उपचार व्हावेत असे सुप्रिया सुळे यांचेही डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. पुढील तपासण्यांचे अहवाल आल्यावर त्यांना पुण्यात ठेवायचे की मुंबईला हलवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.'
रुबी हॉल क्लिनिकमध्ये दररोज अनेक रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करून रुग्णांचे हाल होतील अशी परिस्थिती निर्माण करू नये, असे आवाहनही पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंतेची बातमी समोर आली आहे. बारामतीतील गोविंदबाग येथील निवासस्थानातून त्यांना कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह ताफ्यातून पुण्याकडे नेण्यात आलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पवार यांना खोकला, कफ आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमने सकाळपासूनच गोविंदबागेत त्यांची तपासणी केली. सुमारे तासभर वैद्यकीय पाहणीनंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल या खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला.