

Sanjay Raut Slams BJP: शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर अत्यंत तिखट आणि खालच्या पातळीवर जाऊन हल्लाबोल केला आहे. "भाजप हा दुतोंडी गांडूळ असून सत्तेसाठी ते कोणासोबतही जाऊ शकतात," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी भाजपनं मीरा भाईंदरमध्ये एमआयएमला पाठिंबा दिल्याचा आरोप देखील केला. याचबरोबर त्यांनी अबंरनाथमधील काँग्रेस भाजप युतीवरूनही धारेवर धरलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक मुलाखतीनंतर माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपच्या 'दुटप्पी' राजकारणाचे वाभाडे काढले.
मिरा-भाईंदर आणि अंबरनाथमधील स्थानिक राजकारणाचा दाखला देत राऊत म्हणाले की, "नेहमी हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपला आता 'हिरवे' चालतात का? मिरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमचा (MIM) पाठिंबा घेतला आहे, तर अंबरनाथमध्ये ते काँग्रेससोबत गेले आहेत. ज्यांना 'काँग्रेसमुक्त भारत' करायचा होता, ते आता सत्तेसाठी काँग्रेसच्या पाया पडत आहेत. भाजपची अवस्था कामाठीपुऱ्यातील धंद्यासारखी झाली आहे; जो पैसे देईल, त्याच्या शेजेला जाणारी ही भाजप आहे," अशी जिव्हारी लागणारी टीका त्यांनी केली.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, या दोन्ही नेत्यांना केवळ सत्तेशी देणेघेणे आहे. "यांना भाजपने ब्लॅकमेल करून फोडले आहे. आज हे सत्तेसाठी तिकडे गेले आहेत, उद्या आमची सत्ता आली तर हेच लोक आमच्या दारात येऊन उभे राहतील," असा दावा त्यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याची कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून केवळ प्रचारात व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सावरकर प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, "अजित पवारांना सावरकर मान्य नाहीत, मग त्यांना सोबत का ठेवले आहे? हे केवळ मतांचे राजकारण सुरू आहे." विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलताना त्यांनी एक विचित्र आरोप केला. "भाजपने कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये किती पैसे खाल्ले, हे आम्ही मनेका गांधींना कळवू," असे सांगत त्यांनी भाजपच्या कारभारावर ताशेरे ओढले.