

Makar Sankranti 2026: ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचे कोणत्याही राशीत प्रवेश करणे ही संक्रांत संबोधली जाते. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असेल तर त्याला मकर संक्रांत म्हणतात. यावेळी १४ जानेवारी रोजी सूर्य दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर संक्रांतीच्या काळात दान अन् ध्यान करणे श्रेष्ठ मानलं गेलं आहे. चला तर जाणून घेऊयात २०२६ मधील मकर संक्रांतीवेळी पुण्य काळ आणि महापुण्यकाळ का राहणार आहे.
मकर संक्रांतीचा पुण्य काळ हा १४ जानेवारीला दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर महापुण्यकाळ देखील दुपारी ३ वाजून १३ मिनिटांनी सुरू होणार आहे. त्यामुळं मकर संक्रांती १४ जानेवारीला साजरी करण्यात यावी असे जाणकारांचे मत आहे. असून तो ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी गंगा स्नानाचा काळ सकाळी ९ वाजल्यापासून १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत सूर्योदयापूर्वी स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे, सूर्यदेवाची पूजा करून त्याला अर्घ्य द्यावं. अर्घ्य देताना त्या पाण्यात तांदुळ अन् लाल पुष्प ठेवावं. या दिवशी तीळ, गूळ, तांदुळ वस्त्र आणि चादर दान करावे. तीळ गुळाचे लाडू, खिचडी आणि हंगामी पदार्थ करून ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवावेत.
यावेळी 'ऊं घृणि सूर्याय नमः' या मंत्राचा जप करावा, तसेच गीता आणि सूर्य उपासनेच्या संबंधित ग्रंथ पाठ वाचावेत.
भारताच्या विविध भागात मकर संक्रांती हा दिवस वेगवेगळ्या नावानं आणि वेगवगेळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. तमिळनाडूमध्ये पोंगल, पंजाबमध्ये लोहरी, गुजरातमध्ये उत्तरायण आणि उत्तर भारतात खिचडी किंवा मकर संक्रांती हे सण साजरे केले जातात.
हिंदू धर्मातील मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्या, तीर्थ क्षेत्र आणि तलावांमध्ये स्नान केलं जातं. या दिवशी दान धर्माला विशेष महत्व आहे. या दिवशी सूर्याची उपासना केली जाते. मान्यतेनुसार भगवान सूर्य आजच्या दिवशीच त्यांचे पुत्र शनीदेव यांच्या घरी मकर राशीत भेटण्यासाठी जातात. हा सण पीक कापणीशी देखील जोडला गेला आहे. भारताच्या ग्रामीण भागात या सणाचं विशेष महत्व आहे.
काही धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर राक्षसांचा संहार करत धर्माचा स्थापना केली होती. त्याचबरोबर गंगा नदी भागीरथच्या मागे मागे स्वर्गातून पृथ्वीवर आली आणि याच दिवशी गंगा पतित पावन म्हणून ओळखली जाऊ लागली.