

Sanjay Raut on Gokul Doodh Sangh : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्हाला गोकुळ दूध संघात रस नाही; मग शासननियुक्त संचालक कशाला नियुक्त करता?" असा सवाल करत, "पूर्ण बहुमत १३ चे होते, मात्र पराभूत झालेल्या हसन मुश्रीफ, महाडिक यांना पुन्हा संचालक पदावर घेऊन त्यांच्या हातात सत्ता द्यावी, यासाठी तुम्ही राज्यपालांकडून अध्यादेश काढला आहे. गोकुळसंदर्भात उद्या (दि. ९ नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन होत आहे. महाराष्ट्रात हा विषय फक्त गोकुळचा नाहीये, हा विषय महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा कौल कसा चिरडला जातो, फेटाळला जातो, याचा आहे," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्य सरकारवर निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "गोकुळ अध्यक्ष निवडीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र बसून ठरवावे. मुख्यमंत्र्यांना माहीत पाहिजे की, गोकुळ निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे, तर सतेज पाटील यांचं पॅनेल विजयी झालं आहे."
"गोकुळ अध्यक्ष निवडणुकीत १४ चा कोरम पूर्ण होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणून सतेज पाटील पॅनेलच्या दोन जिंकलेल्या जागा मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये टाकल्या," असा आरोपही त्यांनी केला. "सरकारने दबाव टाकला नसता, तर सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनेलचे १५ संचालक निवडून आले असते," असा दावाही राऊत यांनी केला.
"सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी गोकुळसंदर्भात कोल्हापूरमध्ये मोठे आंदोलन होत आहे. आता महाराष्ट्रात हा विषय फक्त गोकुळचा नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा कौल कसा चिरडला जातो, फेटाळला जातो, या विरोधामध्ये आंदोलन व्हायला पाहिजे. याच्यामध्ये फक्त कोल्हापूरकर नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या सुद्धा भावना या कोल्हापूरकरांच्या पाठीशी आहेत," असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत. त्यांची ही संकल्पना चांगली आहे. राज्यात दुष्काळ आहे, शेतकरी अस्वस्थ आहे, पण एक आहे की मुख्यमंत्र्यांची कल्पना जरी चांगली असली, तरी त्यांनी आता जाऊन पाहायला पाहिजे की, त्यांनी जे पाच हजार रुपये दिलेले आहेत दिवाळी साजरी करण्यासाठी, त्या पाच हजारात खरोखर दिवाळी साजरी होईल का? ही त्यांना तिकडे त्यांच्या घरी गेल्यावर, बांधावर गेल्यावर कळेल," असे सांगत, "सरकार हे शेतकऱ्यांबरोबर आहे, हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; पण शेतकऱ्यांच्या घरी एक दिवसाची दिवाळी साजरी करून त्या शेतकऱ्यांचं दुःख दूर होणार व त्यांचे प्रश्न संपणार नाहीत. त्यासाठी सरकारला अत्यंत ठोस निर्णय घ्यावे लागतील," असेही राऊत म्हणाले.
"गेली काही वर्षे पंतप्रधान सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करतात; पण सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली म्हणून चीनची घुसखोरी थांबत नाही ना! पुलवामा, पहलगामसारखे हल्ले थांबत नाहीत. हा तुमचा एक दिवसाचा कार्यक्रम असतो, पुढे काय? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली, यात नवीन ते काय? याआधी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वारंवार अशा प्रकारचे उपक्रम केले आहेत. नवीन असं काय की खास कौतुक करावं? मुख्यमंत्र्यांचं किंवा राज्यकर्त्यांचं एक कर्तव्यच आहे की, शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही जाऊन पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते. आज मुख्यमंत्री जाऊन एका घरी मांडी घालून फराळ करतायत, आता हा फराळ खरोखर त्या शेतकऱ्याच्या घरी झालाय की कलेक्टरने पाठवलाय डब्यात? मागच्या अनुभवांनी आम्ही स्वतः सगळं अनुभवलं आहे, पाहिलेलं आहे. तरी पण उपक्रम चांगला आहे, या निमित्ताने शेतकऱ्याच्या घरी दिवाळी साजरी होतीय," असेही राऊत म्हणाले.
"राष्ट्रवादी विलीनीकरण हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. काही ठिकाणी रायगडचं राजकारण आहे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचं, एकमेकांना बदनाम करण्याचं. काही ठिकाणी पक्षांतर्गत राजकारण आहे, त्याच्यामध्ये इतरांनी पडू नये. मी इतकंच सांगेल, विलीनीकरण होईल ना होईल, तर हा पुढला प्रश्न; पण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणत्याही परिस्थितीत धर्मांध शक्तींबरोबर, राष्ट्रद्रोही शक्तींबरोबर जाणार नाही, म्हणजे एनडीए बरोबर जाणार नाही," असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
"लालकृष्ण अडवाणी १०० व्या वर्षात पदार्पण करतायत, प्रदीर्घ-दीर्घ आयुष्य त्यांना लाभो, अजूनही ते सक्रिय आहेत, पण मौनात आहेत. आता ते बोलत नाहीत. भाजपला सत्तेच्या शिखरावर पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल, तर लालकृष्ण अडवाणी आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनी केलं. रामजन्मभूमी आंदोलनाचं रणशिंग नुसतं फुंकलं गेलं नाही, तर अडवाणींच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिले.अडवाणींच्या रथावर स्वार होऊन भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली आहे; पण त्याच अडवाणींना नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस यांच्यासारख्या लोकांनी १२ वर्षं वनवासात पाठवलं. रामाची प्रतिष्ठा केली, पण रामाला वैभव प्राप्त करून देणाऱ्या अडवाणींना मात्र या सगळ्यांनी मिळून वनवासात टाकलं, तेव्हापासून अडवाणी हे मौनामध्ये सावरलेले नाहीत. अडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत, अडवाणी अत्यंत महत्त्वाचे लोहपुरुष होते, ते गृहमंत्री, उपपंतप्रधान होते. अडवाणी हे या लोकांच्या ऐकण्यातले नव्हते, स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि अस्मिता होती. त्याच्यामुळे सत्तेच्या माध्यमातून या लोकांनी लालकृष्ण अडवाणींना बाजूला टाकलं," असा आरोपही संजय राऊत यांनी केला.