

Sanjay Raut statement on NCP: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एसआयआर अन् मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याबाबत आलेल्या वृत्तानंतर ठाकरे बंधूंनी मोर्चाची आखणी केली आहे. तर शरद पवार यांनी आम्ही कुठंही जाणार नाही. आम्ही सत्तेसोबत जाणार नाही तुम्हाला यायचं असेल तर आमच्या सोबत या असं मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता संजय राऊत यांनी भाष्य केलं असून त्यांनी राज ठाकरे यांचा राहुल गांधी यांच्याशी संवाद असल्याचं सांगितलं तसंच शरद पवार, पंतप्रधान मोदी यांचे बारामती दौरे यावर देखील वक्तव्य केलं.
संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'शिवतीर्थावर दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद असेल. ४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराविरोधात आणि ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करण्याच्या मागणीबाबत मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना आणि मनसेने याबाबत पुढाकार घेतला असल्याचं सांगितलं.
राऊत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि आम्ही व्हीसीआरद्वारे सहभागी होऊ असं देखील सांगितलं. आमच्या आंदोलनामुळे आम्ही इकडे बिझी असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन बैठकीला हजर राहू.
राऊत म्हणाले, काँग्रेसने नागपुरात काल मोठे आंदोनल केले मविआ म्हणून सर्वांनी एकत्र सामील व्हावे असं आवाहन करतोय. एकट्याने काही होणार नाही देश एकटवला पाहिजे असं देखील राऊत यांनी सांगितलं.
राज ठाकरेंबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीच्या बैठकीला निवडणूक आयोग हा विषय असेल राज ठाकरे हा विषय नाही. राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात संवाद आहे अन् असा संवाद का असू नये. ममता दिदी देखील बैठकीला असतील.
राऊत यांनी शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, 'पवार साहेब कुठेही जाणार नाहीत. ते मविआचे पिलर आहेत. काही चर्चा होतच असतात. कारखाना वगैरे या विषयांवर तो पक्ष कुठेही जाणार नाही.' मोदी बारामतीला येतात आणि जातात त्यांची ती ट्रॅव्हल कंपनी आहे. असं खोचक विधान देखील राऊत यांनी केलं.
तटकरे यांच्या वक्तव्यावर देखील राऊत यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले, तटकरे यांच्यासमोर पर्याय नाही. तो अमित शहांचा पक्ष आहे. मोदी हा पक्ष बुडवणार आहेत.