

Maharashtra Legislative Council Election 2026 Exit Poll
मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीचा अंदाज ‘साम टीव्ही’च्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यानुसार पाच जागांपैकी महायुतीला तब्बल चार जागांवर विजयाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला दोन, शिवसेना (शिंदे गट) पक्षाला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एक्झिट पोलनुसार भाजपचे पारडे जड असल्याचे समोर आले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख यांच्यात थेट लढत झाली. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार डॉ. स्मिता जाधव या संभाव्य आमदार ठरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण सुमारे ३ लाख ८८ हजार मतदार असून, दोन्ही प्रमुख उमेदवार उच्चशिक्षित महिला असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांत भाजपने पुणे विभागासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात राबवलेली आक्रमक प्रचार रणनीती, मजबूत संघटनात्मक ताकद आणि ‘मॅन टू मॅन’ नेटवर्क यामुळे भाजपला ही आघाडी मिळताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हर्षदा देशमुख यांनीही आव्हान उभे केले असले, तरी सद्य:स्थितीत भाजपची बाजू वरचढ ठरत असल्याचे राजकीय विश्लेषणातून स्पष्ट होत आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत महायुतीला धक्का बसण्याची शक्यता असून, एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या आदिती पोहरे या संभाव्य आमदार ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीकडून ही जागा शिवसेना (शिंदे गट) पक्षाला सुटली होती आणि किरण सरनाईक हे अधिकृत उमेदवार होते; मात्र भाजप व शिंदे सेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे सरनाईक यांच्यासमोर चार बंडखोरांचे कडवे आव्हान उभे राहिले.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप विजयाचे दावेदार मानले जात आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आपली पकड कायम ठेवत पुन्हा बाजी मारण्याची शक्यता आहे.