पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) पाचही जिल्ह्यांत उत्साहात मतदान पार पडले. पुणे पदवीधर मतदारसंघात ‘पदवीधर’ला ६२.७८ टक्के, तर शिक्षक मतदारसंघांत ८५.८७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाने उच्चांक गाठला, हे विशेष.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणूक प्रक्रियेला प्रतिसाद दिला. पदवीधरच्या ४७, तर शिक्षक मतदारसंघातील ३० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघात ६१.४७ टक्के, सातारा ६६.८२, सांगली ५५.६२, कोल्हापूर ६३.८३ आणि सोलापूरमध्ये ७१.४२ टक्के मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात ७८.०८ टक्के, सातारा ८९.३९ टक्के, सांगली ८७.८३, कोल्हापूर ८८.६२ आणि सोलापूरमध्ये ८९ टक्के मतदान झाले.
पुणे विभागातील या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदान साहित्याचे वितरण आणि निवडणूक प्रक्रियेचे नियोजन केले होते. मतदानाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेतली होती.
पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या हर्षदा देशमुख यांच्यात प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे; तर शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात ही लढत होती. पदवीधर मतदारसंघात उच्चशिक्षितांनी, तर शिक्षक मतदारसंघात शिक्षकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. पसंतीचा उमेदवार निवडण्यासाठी मतदार मतदान केंद्रांवर दाखल झाले. पाचही जिल्ह्यांत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले होते. राजकीय पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या पदवीधरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी १ लाख २२ हजार १४५ मते मिळवत विजय प्राप्त केला होता; तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या जयंत आसगावकर २५ हजार ९८५ मते मिळवून विजयी झाले होते. यावेळी मात्र या निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकदीने नियोजन केल्याने या निवडणुकीत रंगत वाढली आहे.
आता लक्ष निकालाकडे
एकूणच पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत पार पडलेल्या या मतदानामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता मतमोजणीतून मतदारांचा कौल स्पष्ट होणार असून, विजयी उमेदवार कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
४.८२ ने वाढला टक्का
डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत पदवीधर विभागात ५७.९६ टक्के मतदान झाले होते. यावेळी ६२.७८ टक्के मतदान झाले.