

RBI Recruitment 2026
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नोकरी करणे हे देशातील अत्यंत प्रतिष्ठित मानले जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी हे स्वप्न सत्यात उतरवण्याची सुवर्णसंधी आहे. RBI ने 'ऑफिस अटेंडंट' पदासाठी ५०० हून अधिक जागांसाठी भरती काढली आहे. यासाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी नक्की काय काम करावे लागते आणि पगार किती मिळतो, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला लखनऊ-कानपूर, भोपाळ, पाटणा, चेन्नई, जयपूर, कोलकाता यासह त्यांच्या १४ कार्यालयांसाठी अटेंडंटची आवश्यकता आहे. एकूण ५७२ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी उत्तीर्ण उमेदवार ४ फेब्रुवारीपर्यंत यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी थेट लिंक : https://ibpsreg.ibps.in/rbipodec25/
रिझर्व्ह बँकेतील ऑफिस अटेंडंट हे पद वर्ग ४ मध्ये येते. त्यांच्या कामाची जबाबदारी म्हणजे, फायलींचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे, कार्यालयातील सामान आणि इतर वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. टपाल पाठवणे. सेक्शन/डिव्हिजन/डिपार्टमेंट उघडणे आणि बंद करणे. कागदपत्रांची झेरॉक्स करणे. दैनंदिन कामात मदत करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली इतर महत्त्वाची कामे पूर्ण करणे.
RBI च्या अधिसूचनेनुसार, या पदासाठी वेतनश्रेणी २४,२५० रूपये ते ५३,५५० रूपये दरम्यान असेल. सुरुवातीचा मूळ पगार २४,२५० रूपये इतका असेल. सुरुवातीचा अंदाजित एकूण मासिक पगार सुमारे ४६,०२९ रूपये इतका असेल. याव्यतिरिक्त १५% घरभाडे भत्ता देखील दिला जाईल. पगारामध्ये HRA जोडल्यानंतर प्रत्यक्ष हातात येणारी रक्कम अजून वाढेल.
पगाराव्यतिरिक्त RBI ऑफिस अटेंडंटला अनेक भत्ते आणि सुविधा मिळतात. वैद्यकीय सुविधा, नॉलेज अपडेशन अलाउन्स, फर्निशिंग भत्ता, ग्रुप टर्म लाइफ इन्शुरन्स, वाहन विमा, प्रवास भत्ता, लीव्ह फेअर कन्सेशन, शिक्षण प्रतिपूर्ती, चष्मा आणि लेन्सचा खर्च, याशिवाय नवीन कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि 'डिफाइन्ड कॉन्ट्रिब्युशन न्यू पेन्शन स्कीम' अंतर्गत संरक्षण मिळेल.