

मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांतील शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जागावाटप अद्याप अंतिम झाले नसले तरी बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २३) याबाबत माहिती दिली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुंची युती झालेलीच आहे. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली असून कोणताही संभ्रम नाही. फक्त घोषणा करायचा विषय आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई आणि इतर पालिकेत कार्यकर्त्यांकडून सोबत काम करायला सुरुवात झाली आहे, तशा सूचना दिल्या आहेत. युती झाली आहे, फक्त जागावाटवपाबाबत काल रात्री शेवटची भेट झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन घोषणा करतील. नाशिकमध्ये चर्चा आटोपली आहे. पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जागावाटप झाले आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीतील युतीच्या अभूतपूर्व यशानंतर महानगरपालिकांना सामोरे जाण्यासाठी एकदिलाने काम करू. नागरिकांना महाराष्ट्र बदलतो आहे, प्रगतिपथावर आहे याची हमी देण्यासाठी जागावाटप चर्चा फार न लांबवता, त्याला फाटे न फोडता एकीचे वातावरण जनतेपर्यंत पोहोचवावे असा निर्णय आज भाजप बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते.