

Sandeep Deshpande BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्रित निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्या तरी या युतीची काही घोषणा होत नव्हती. अखेर आज मनसेचे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक प्रश्नांनी उत्तरे दिली.
पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी युतीबाबत आमच्या पक्षाचे नेते राज ठाकरे घोषणा करतील. जागावाटपाची चर्चा अजून सुरू आहे असं सांगितलं. त्यावेळी त्यांना काही जांगांबाबत तिढा आहे का असं विचारलं असता त्यांनी जागेबाबत तिढा वैगेरे काही नाही.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोणत्या जागेवर कोणाचा कार्यकर्ता चांगला याची चर्चा करत आहेत. डेटा गोळा केला जात आहे त्याप्रमाणे चर्चा करत आहेत. संदीप देशपांडे यांनी मुंबईसाठी दोन्ही बंधू एकत्र आल्याचं सांगत जवळपास युती फिक्स झाल्याचे संकेत दिले.
याचबरोबर संदीप देशपांडेंनी यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आमच्याकडे कोणी नाराज नाही असं सांगत जागा वाटप सुरळीत सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संदीप देशपांडे यांनी मुंबईसाठी मराठी माणसासाठी सगळेच जण त्याग करण्यासाठी तयार आहेत असं सुचक वक्तव्य केलं. त्यांनी युतीची घोषणा कधी होणार या प्रश्नावर युतीची घोषणा लवकरच होईल असं सांगितलं.
दरम्यन, संदीप देशपांडे पत्रकारांशी बोलत असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून उद्या म्हणजे २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिवसेना आणि मनसेची युतीची घोषणा होणार असल्याचे जाहीर करून टाकले. मात्र ही घोषणा कुठून अन् कशा प्रकारे करण्यात येईल याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच जागावाटपचा फॉर्म्युला देखील उद्या १२ वाजता जाहीर होण्याची शक्यता फार कमी असल्याचं जाणकारांच मत आहे.