

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील डाॅक्युमेंट्री आपल्या समाजमाध्यमांच्या अकाऊंटवरून रविवारी डिलिट केल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित मैत्रीसंदर्भात सबीर भाटिया यांनी तयार केलेली डाॅक्युमेंट्री अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या अकाऊंटवर शेअर केली होती.
आता, मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखत डाॅक्युमेंट्रीची पोस्ट हटवत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत कार्यक्षम दल आहे आणि त्यांच्याबद्दल मनात नेहमीच आदर आहे.
म्हणूनच पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा सन्मान करत लघुपट हटवत असल्याचे त्यांनी सांगितले.तरीही, एकाधिकारशाहीविरोधात सुरू झालेला हा लढा यापुढेही कायम राहील आणि जानेवारी २०२६ च्या शिवतीर्थावरील सभेत पेटवलेली ठिणगी पुढे वणवा बनून धगधगत राहील.
गौतम अदानी यांच्या एकाधिकारशाहीमुळे देश कसा धोक्यात येत आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवणे हाच या लघुपटाच्या प्रसाराचा मुख्य उद्देश होता, असे राज ठाकरे यांनी यासंदर्भातील पोस्टमध्ये नमूद केले. ट्विटरवर ४८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याने हा हेतू पूर्ण झाला आहे. माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नसून देशातील एकाधिकारशाहीला आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारवरही टीका केली. भीमाशंकर येथील शेकडो हेक्टर वन जमीन गुजरातच्या टोरेंट कंपनीला देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत, महाराष्ट्रातील जमिनी ठरावीक उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. आपल्या डोळ्यांसमोर महाराष्ट्र विकला जात असताना लोकप्रतिनिधी शांत कसे राहू शकतात? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.
२७ ऑक्टोबरला कर्जत येथे सभा
दरम्यान, कर्जत-भीमाशंकर येथील वृक्षतोडीसंदर्भात तेथील नागरिकांनी रविवारी सकाळी ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. वृक्षतोड आणि त्याचा जैवविविधतेवर होणारा परिणाम याबाबत नागरिकांनी ठाकरे यांना माहिती दिली. त्यानंतर ठाकरे यांनी २७ ऑक्टोबर रोजी कर्जत येथे येऊन जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले.