

नवी मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे.
बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शासन आणि उद्योगाच्या माध्यमातून ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील महापे येथील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी, उपाध्यक्ष शौनक पारिख आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि व्यावसायिकतेची जागतिक स्तरावर ओळख आहे. रत्न व आभूषण उद्योगासाठी आवश्यक असलेले कुशल कारागीर, उद्योजकता, व्यापाराचे अनुभवसंपन्न जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत.
या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याला जागतिक दागिने उद्योगातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याची संधी ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. जागतिक स्तरावरील बदलती परिस्थिती आणि अमेरिका व चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत.
अशा परिस्थितीत उद्योगांनी बदलत्या बाजारपेठांचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही यांनी दिली.
एक लाख रोजगारांची निर्मिती : शिंदे
इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पामुळे सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात एक लाख रोजगारांच्या संधी निर्माण होतील. महापे येथील २२ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणारे हे दागिने उत्पादन केंद्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील रत्न व आभूषणे उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनविण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईचे महत्त्व वाढेल : नाईक
भविष्यात नवी मुंबईची ओळख डेटा सेंटर हब म्हणून निर्माण होण्याबरोबरच इंडिया ज्वेलरी पार्कमुळे जागतिक स्तरावर या शहराचे महत्त्व वाढणार आहे. राज्यासमोर नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेच्या लाटेसारखी आव्हाने असतानाही शेतकरी, कामगार, नागरिकांना शाश्वत जीवन जगण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.