Raj Thackeray: 'विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई का नाही?' दिल्ली आंदोलनावरून राज ठाकरेंचा सरकारला थेट सवाल

Raj Thackeray Delhi Student Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Raj Thackeray Delhi Student Protest
Raj Thackeray Delhi Student ProtestPhoto
Published on
Updated on

Raj Thackeray Delhi Student Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित बळाच्या वापरावर त्यांनी नाराजी व्यक्त करत, "शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली तर त्यांच्यावर कारवाई होते, मग आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?" असा सवाल केला आहे.

विद्यार्थी आंदोलनावरून संताप

NEET परीक्षेतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ दिल्लीत विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू असून, या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली.

त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारे बळाचा वापर करण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray Delhi Student Protest
Abhijeet Dipke On Sonam Wangchuk: पिक्चर अभी बाकी हैं... जोपर्यंत राजीनामा नाही तोपर्यंत माघार नाही! दिपकेंनी स्पष्टच सांगितलं

'पोलिसांना आदेशाशिवाय असे करणे शक्य नाही'

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आंदोलनादरम्यान समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये केवळ आंदोलनकर्तेच नव्हे तर परिसरातील इतर नागरिकांनाही मारहाण होत असल्याचे दिसते. अशा प्रकारची कारवाई वरिष्ठांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

त्यांनी असेही नमूद केले की, पोलिसांना अनेकदा वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसारच कारवाई करावी लागते. त्यामुळे केवळ पोलिसांनाच दोष देणे योग्य ठरणार नाही; तर असे आदेश देणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.

'विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाही नाही'

राज ठाकरे यांनी शाळांमधील शारीरिक शिक्षेचा संदर्भ देत म्हटले की, पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करत असत, मात्र न्यायव्यवस्थेच्या हस्तक्षेपानंतर त्यावर निर्बंध आले. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कोणालाही नाही, मग आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray Delhi Student Protest
Rahul Gandhi: 'धर्मेंद्र प्रधानांना हटवा', PM मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधी आक्रमक; सरकारसमोर ठेवल्या 3 मागण्या

आंतरराष्ट्रीय निकषांचा उल्लेख

आपल्या भूमिकेत त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations) आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने मांडलेल्या तत्त्वांचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत बळाचा वापर करताना तो कायद्याच्या चौकटीत, आवश्यक तेव्हाच, प्रमाणबद्ध आणि उत्तरदायित्वासह असला पाहिजे.

तसेच नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क आणि न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये पोलिसांकडून बळाचा वापर झाल्यास त्याची स्वतंत्र चौकशी केली जाते आणि विशेषतः आदेश देणाऱ्यांची जबाबदारी तपासली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

संसद आणि नागरी समाजाने पुढे यावे

राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर नागरी समाजाने चर्चा घडवून आणण्याची गरज व्यक्त केली. तसेच खासदारांनी संसदेत या विषयावर चर्चा व्हावी, अशी मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news