

Abhijeet Dipke On Sonam Wangchuk: गेल्या २६ दिवसांपासून आमरण उपोषणावर बसलेल्या सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले असून ते लवकरच सरकारसोबत कोणत्या मुद्द्यावर सहमती झाली आहे याचा खुलासा करणार आहेत.
दरम्यान, जंतर मंतरवर आंदोलनाला बसलेल्या अभिजीत दिपके यांनी सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचा आनंद आहे. त्यांची जीव संपूर्ण देशासाठी महत्वाचा आहे असे सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलन मागे घेतले जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये सोनम वांगचुक यांनी अत्यंत मोठं धाडस आणि त्याग केला आहे. दिपके म्हणतात, 'आम्हाला सोनम वांगचुक सरांनी आपले उपोषण २६ दिवसांनंतर सोडल्याचा अत्यानंद आहेच. त्याचबरोबर आमच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. आम्ही त्याबाबत त्यांचे आभारी आहोत. त्यांनी मोठं धाडस आणि त्याग केला आहे. त्यांनी स्वतःचा जीव पणाला लावला. तुम्ही संपूर्ण देशाला भानावर आणलं. तुमचा जीव देशाच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाचा आहे.'
दिपके यांनी जरी सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे घेण्याचं स्वागत केलं असलं तरी त्यांनी आंदोलन अजून संपलं नसल्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, 'कॉक्रोज जनता पार्टीचे शांततापूर्ण आंदोलन जंतर मंतरवर सुरूच ठेवणार आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे.'
वांगचुक यांनी नीट परीक्षेतील गोंधळ आणि हा विषय सरकारने योग्य प्रकारे हाताळला नाही यावरून आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनात जाऊन तिथं आमरण उपोषण सुरू केलं होतं.