

Pudhari VMR Survey 2025 Regionwise Data
देवेंद्र फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या जनमानसात सरकारविषयी नेमकी काय भावना आहे, याचा अंदाज घेण्यासाठी पुढारी आणि व्हीएमआर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणे समोर आली आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीस, तर विधानसभेत महायुतीस बहुमत देणार्या महाराष्ट्रातल्या ५३ टक्के जनतेने राज्य सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. याच पाहणीतून राज्यातील विविध विभागातील नागरिकांनी सरकारच्या कामगिरीविषयी काय कौल दिला आहे, त्याविषयी...
महामुंबई ५५%
राज्याची राजधानी असलेल्या महामुंबईत नागरिकांनी (मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह) भाजपाला पहिली पसंती दिली आहे. केवळ ग्रामीण भागात नव्हे तर मुंबईतही लाडकी बहीण योजनेचे अनेक लाभार्थी असल्याने ५४ टक्के लोकांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे मुंबईतली गेल्या काही महिन्यात सातत्याने बदलणारी समीकरणे बघितली तर सर्वेक्षणातील अंदाजानुसार शिवसेनेचा मतदार शिंदे व ठाकरे गटात स्पष्टपणे विभागलेला आहे, असे चित्र दिसते आहे. मुंबईमधला पारंपरिक काँग्रेसचा मतदार काँगेसच्या बाजूनेच राहिला आहे, ही महाविकासआघाडीसाठी जमेची बाजू म्हणावी लागेल.
कोकण ६६%
राज्य सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का, असा प्रश्न विचारला असता कोकण विभागात सर्वाधिक ६६ टक्के नागरिकांनी महायुती सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचा अभिप्राय दिला. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असणार्या या भागात शिवसेनेचे दोन्ही गट आपला प्रभाव सांभाळून आहेत. स्थानिक पातळीवर असलेली संघटनात्मक ताकद हे दोन्ही शिवसेना गटांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या भागात असलेली ताकद आता क्षीण झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुंबई आणि कोकणातले चाकरमाने यांचे संबंध लक्षात घेता मुंबईत महायुतीकडून करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती कोकणात उत्तम प्रकारे पोचत असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर येते.
मराठवाडा ४५%
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील थेट दुभंग मराठवाड्यात दिसून येतो. या विभागात सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करणार्यांची संख्या ५० टक्क्यांहून कमी (४५ टक्के) आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मोठा वर्ग भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने असला तरी निम्म्याहून अधिक जनता सरकारवर समाधानी नसल्याचे सर्वेक्षणातून समोर येते. मराठवाड्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विविध मतदारसंघावर असलेला प्रभाव यामुळे मविआसाठी येथे पोषक वातावरण आहे.
विदर्भ ५२%
विदर्भाचा राजकीय इतिहास पाहिल्यास भाजपा आणि काँग्रेस यांच्यात कायम रस्सीखेच राहिलेली दिसते. पुढारी-व्हीएमआरच्या सर्वेक्षणामध्येही हेच राजकीय चित्र प्रतिबिबिंत झाले आहे. राज्य सरकारच्या कामगिरीवर समाधानी असणार्यांची संख्या इथे ५२ टक्के इतकी आहे. नागपूरचे सुपुत्र असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विदर्भातील लोकप्रियता निर्विवाद आहे आणि विदर्भ त्यांच्या प्रतिमेमुळेच भाजपाच्या मागे अत्यंत खंबीरपणे उभा असल्याचे दिसून येते.
पश्चिम महाराष्ट्र ४५%
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पॉवरहाऊस असलेल्या पश्चिम महाराष्ट्राचा राजकीय रंग सर्वेक्षणामध्ये बदलताना दिसतो आहे. सरकारच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केलेल्यांचा आकडा इथे ५५ टक्के इतका आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचाही प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात जाणवतो; मात्र तरीही पश्चिम महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस लोकप्रिय नेत्यांच्या स्पर्धेत अव्वल स्थानी असल्याचे दिसून येते.
खान्देश ५६%
खान्देशाचा विचार केल्यास इथल्या ५६ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. ही महायुती आणि भाजपासाठी दिलासादायक बाब आहे. भाजपा आणि शिवसेना या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांचा या भागात सम-समान प्रभाव असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणाच्या माध्यमातून नोंदवण्यात आले आहे.
महिला, युवक महायुतीच्या पाठीशी, बहुतांश गटांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठ
लिंग आणि वयोगटनिहाय विश्लेषणातील निरिक्षणे
महायुती सरकारच्या महिलाकेंद्रित धोरणांमुळे राज्यातील सुमारे ३३.४२ टक्के महिलांनी भाजपला कौल दिल्याचे आकडेवारीतून दिसते, तर निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींमुळे ३५.९६ टक्के पुरुषांनी भाजपला क्रमांक एकचा पक्ष म्हणून निवडले आहे. विविध वयोगटातील नागरिकांना जेव्हा त्यांच्या पसंतीच्या सरकारबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा १८ ते ५० या सर्व वयोगटीतला नागरिकांनी भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून पसंती दिली आहे.
(पुढारी माध्यम समूह आणि व्हीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या सर्वेक्षणातील नोंदी)