

Pudhari VMR Survey Analysis Devendra Fadnavis Politics
मृणालिनी नानिवडेकर, मल्टिमीडिया एडिटर, पुढारी समूह
भारताच्या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागामधला महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने जिंकणे हे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाचा राजशकट हाकण्यासाठी काही प्रभावी नेत्यांची गरज आहे आणि काही मोठे भौगोलिक आर्थिक प्रदेश जिंकण्याचीही! महाराष्ट्रात पक्षाच्या कुंडलीत आलेला देवेंद्र फडणवीस नावाचा योग या दोन्ही गरजा पूर्ण करताना दिसतो आहे! देव-धर्म-देश-संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचे भान असणार्या नेत्यास संधी देत, परंपरा आणि आधुनिकतेला कवेत घेत, भविष्याचा वेध घेण्याची भाजप आणि संघ परिवाराची इच्छा आहे. त्यासाठी तयार झालेले कार्यकर्ते परिवाराच्या प्रयोग शाळेतून सातत्याने निघतात, पण राजकारणाच्या अजब रसायनात घोळताच ते सत्वानीशी टिकतात किंवा यशस्वी होतात, असे खात्रीने सांगता येत नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा ब्रँड या कसोटीवर उतरला आहे आणि पक्षाला यशही मिळवून देतो आहे.
लोकसभेत ४८ खासदार निवडून देणारा महाराष्ट्र हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी महत्त्वाचा प्रदेश तर आहेच, शिवाय तो उत्तर आणि दक्षिण या भारताच्या दोन्ही भागांमधला दुवा आहे. नर्मदा भारताचे विभाजन करत असेल तर त्या खालोखाल असलेला महाराष्ट्राचा टापू भारतीय जनता पक्षाने जिंकणे हे कायमच महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या महाराष्ट्राने भाजपच्या हाताशी फारसे काही लागू दिले नाही, तरी महाराष्ट्रात भाजप हा पुन्हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे त्यातले क्रमांक एकचे नेते आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. ५ डिसेंबर २०२४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तशी तिसरी आणि खर्या अर्थाने दुसरी शपथ घेतली तेव्हा पक्षाला पुन्हा एकदा या प्रदेशावर आपला हक्क असल्याचा दावा निर्विवादपणे करता आला.
२०१४ साली भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेत क्रमांक एकचा पक्ष केले तेव्हाही जात आणि अन्य कोणत्याही निकषांचा बडिवार न करता फडणवीस यांची निवड पक्षाने केली होती ती आधुनिक काळात पक्षाला पुढे नेणारे नेते या अपेक्षेने! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती निवड केली असणार हे स्पष्ट होते. त्या पाच वर्षांच्या पहिल्या कामगिरीनंतर २०१९ साली फडणवीस हे सर्वाधिक जागा जिंकून पहिला क्रमांक राखणारे कर्णधार तर ठरले; पण चुकलेल्या मैत्रीच्या समीकरणांमुळे सगळाच विचका झाला. त्यानंतर कर्णधाराला आधी विरोधी पक्ष नेते पदावर समाधान मानावे लागले. विजेते फडणवीस अडीच वर्षांनंतरच्या सत्तेच्या विलक्षण खेळात डाव पलटवण्यात पुन्हा यशस्वी तर झाले. पण त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. एकनाथ शिंदे हे महाशक्तीने तयार केलेले नेतृत्व दिसा-मासानी वाढत असताना केवळ पक्षाचा आदेश म्हणून त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्र्याची कामगिरी करणार्या फडणवीस यांना विधानसभेत लाडक्या बहिणींनी साथ दिली आणि ते पुन्हा एकदा त्यांच्या हक्काच्या प्रमुखपदी येऊन बसले. खरे तर भारतीय जनता पक्षाने प्रत्येक राज्याबाबत नेतृत्वासाठी धक्कातंत्र आजमावण्यावरही जोर द्यायला सुरुवात केली होती. मात्र महाराष्ट्राच्या सामाजिक ताण्याबाण्यात न बसणार्या या नेत्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा फेटा बांधला गेला तो या नेत्याच्या चिकाटीमुळे जिद्दीमुळे आणि मुख्य म्हणजे भविष्याचा आदमास घेऊ शकणार्या दूरदृष्टीच्या नजरेमुळे!
महाराष्ट्र हे अन्य राज्यांच्या तुलनेत उत्पन्न वाढवून देणारे राज्य आहे. या राज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था महासत्ता या पातळीवर पोहोचू शकेल याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे आणि मोदी यांचे उत्तराधिकारी असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही ते समजते आहे. आर्थिक प्रगतीचे शिवधनुष्य उचलणारा चेहरा दुसरा कोणीही असू शकत नाही, तर फडणवीस हाच एकमेव पर्याय असल्याचे स्वीकारल्यामुळे एक वर्षांपूर्वी त्यांचा शपथविधी झाला आणि गेल्या एक वर्षात ते महाराष्ट्राचा मुख्याधिकारी असल्याची चोख कामगिरी बजावत आहेत. गेल्या ३६५ दिवसांतील देवेंद्र फडणवीस यांच्या दैनंदिनीतील पाने पाहिली. त्यातील अर्धे दिवस उद्योगांशी करार करण्यात गेलेले दिसतात. महाराष्ट्राच्या सामाजिक आशयाला ते समजून घेतात. दुष्काळी भागात पाणी पोहोचवणार्या नदीजोड योजना असतील किंवा शेतकर्यांना हक्काची वीज मिळवून देणार्या कृषी पंप योजना फडणवीस चोवीस तास मुख्याधिकार्याच्या भूमिकेत वावरत ही कामे मार्गी लावताना दिसत आहेत.
जागतिकीकरणाचे वारे जेव्हा भारतात डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात शिरू लागले होते त्यावेळेला चंद्राबाबू नायडू हे असेच सीईओ असलेले मुख्यमंत्री गाजत होते. आज फडणवीस देखील त्याच प्रकारे करारमदार करत आहेत. पण चंद्राबाबूंपेक्षा त्यांचे वेगळेपण म्हणजे जातीचा कोणताही आधार नसलेल्या या नेत्याने महाराष्ट्रातील सामाजिक वीण घट्ट करण्याचा प्रयत्नही सुरू ठेवला आहे. महाराष्ट्रात एकसंध असलेला राजकीय वर्ग हा मराठा आणि या मराठा समाजाच्या तथाकथित वर्चस्वाला शह देण्यासाठी प्रयत्न करणारा ओबीसी जात समूह हादेखील तेवढाच गतीशील आहे. सामाजिक आयाम असलेल्या या महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराजांबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही खास स्थान आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्ववादी विचारही जन्मला, रुजला आणि वाढला तो याच भूमीत. त्यातच महाराष्ट्राला वैचारिकतेची आगळी जाणीव आहे. या सगळ्या परिस्थितीचा आदमास घेत भविष्यासाठी निर्णय घेणे हे फारसे सोपे काम नाही. ते फडणवीस यांनी आत्तापर्यंत करून दाखवलेले दिसते. खरे तर भारतीय जनता पक्षाला ‘एक राज्य - एक नेता’ हे तत्व वाजपेयी आणि अडवाणी यांच्या काळात पूर्णतः मान्य होते. गुजरात (नरेंद्र मोदी), उत्तर प्रदेश (कल्याण सिंग), मध्य प्रदेश (शिवराज सिंह चौहान), राजस्थान (वसुंधरा राजे शिंदे) या राज्यांतील कर्णधारास कुठेही नख लावता भाजपाने तेथील नेतृत्त्वास वाढू दिले. त्या पहिल्या पिढीतही भैरोसिंह शेखावतांसारखे उदाहरण होते. मात्र बदललेल्या भाजपाने स्थळ-काळ-परिस्थितीनुसार या चेहर्याऐवजी नवे चेहरे आणले. नवे चेहरे आणण्याच्या या प्रयत्नांना महाराष्ट्रात फडणवीस यांनी रोखले. त्यामागचे खरे कारण त्यांची कामावरील निष्ठा आणि त्या निष्ठेमुळे महाराष्ट्रात त्यांनी मिळवलेली लोकप्रियता. आज महाराष्ट्राच्या नेता मांंदियाळीत फडणवीस यांनी स्वतःचे प्रथम क्रमांकाचे स्थान निश्चित केले आहे. स्वतःचे स्थान पक्षाच्या वाढीसाठी उपयोगी पडावे याचे भान त्यांनी सातत्याने ठेवले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी पक्षाचा आदेश मान्य न करता रूसून बसण्याचा मार्ग फडणवीस यांना पत्करता आला असता. मात्र फडणवीस हे चाणाक्ष नेते असल्यामुळे केंद्रीय नेतृत्वाला नाराज करणे योग्य नाही, याची वेळीच दखल घेत त्यांनी अप्रिय असलेला निर्णय देखील स्वीकारला. त्या अप्रिय स्वीकृतीची गोमटी फळे आज त्यांना मिळत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांनी एका विशिष्ट पक्षाला जी प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे, ती लोकप्रियता वापरून पक्षाचा विस्तार करण्याचे शिवधनुष्यही फडणवीस पेलावे लागणार आहे. व्यक्तिशः फडणवीस यांची कामगिरी कायमच सरस ठरत असली, तरी स्वतःसारखे नेते निर्माण करण्याचे आव्हान फडणवीस यांना पुढच्या काळात पेलावे लागणार आहे. महाराष्ट्र म्हणजे फडणवीस असे समीकरण सध्या आहे हे ठीकच, पण भविष्यात महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असतील तर चार ते पाच समान ताकदीचे नेते निर्माण करावे लागतील. असे नेतृत्व उदयाला येत नसेल, तर त्याला ताकद द्यावी लागेल. भारतीय जनता पक्षाने आजवर महाराष्ट्राचा प्रदेश शिवसेनेच्या खांद्यावर चढून पाहिला अशी टीका होत असते. हे खांदे नकोसे झाले किंवा या खांद्यांनी पक्षाचा भार वाहणे नाकारले त्यावेळेला झालेले महाभारत महाराष्ट्राला आजही अस्वस्थ करणारे आहे. पाच वर्षांपूर्वी भगव्या युतीचा जो काय खेळखंडोबा झाला त्याने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान केले आहे. फडणवीस यांचे नुकसान तर झालेच, पण महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेला. ही दहा वर्षांची उणीव फडणवीस आणि त्यांच्या चमूला भरून काढायची आहे. महाशक्ती म्हणून शिवसेनेसह खेळी करताना एकनाथ शिंदे नावाचे जे नवे नेतृत्व उदयाला आले, तेदेखील गेल्या पाच वर्षार्ंत कमालीचे लोकप्रिय ठरते आहे. रॉबिनहूड प्रतिमा, प्रत्येकाला मदत करणारा स्वभाव, जातीचे पाठबळ यामुळे शिंदे महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते झाले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक जाणिवांचा विचार करत धर्मनिरपेक्षतेचा उदो उदो करणार्या अजितदादा पवारांचीही या सरकारला साथ आहे. अजितदादांना समवेत ठेवताना धर्मनिरपेक्षतेचा प्रवाह विकासागामी हिंदुत्वाच्या प्रवाहात कसा सामावून घेता येईल, असे आव्हान पेलावे लागणार आहे.
फडणवीस स्वच्छ आहेत म्हणून सरकार स्वच्छ आहे असे थोडेच होते. गेल्या एक वर्षात या सरकारच्या मंत्र्यांवर ज्या प्रकारचे आरोप झाले, ते सरकारच्या प्रतिमेला डाग लावणारे आहेत. हे डाग भारतीय जनता पक्ष नावाचं वॉशिंग मशीनही निश्चितपणे धुऊ शकणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्राला अधिक बलशाली करताना मंत्रिमंडळातील सहकार्यांची गुणवत्ता आमदारांची लोकप्रियता आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची हमी अशा त्रिसूत्रीवर मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांना लक्ष द्यायचे आहे. आगामी चार वर्षे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. येणारी गुंतवणूक खरोखरच प्रत्यक्षात रोजगार निर्मिती करू शकते काय, शेतीचे प्रश्न सुटतात काय, लाडकी बहीण सारखी योजना चालवायला निधी कुठून आणणार असे अनेक प्रश्न फडणवीस यांच्यासमोर आहेत. पहिले वर्ष त्यांनी दमदार कामगिरी करत अपेक्षा वाढवल्या आहेत. आता होणारे करार प्रत्यक्षात कसे उतरतात यावर महाराष्ट्राचेच नव्हे, तर फडणवीस यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. येत्या चार वर्षांत महाराष्ट्राला युरोपातील संपन्न राष्ट्रांच्या बरोबरीने विकासदर गाठता येतो का, याकडे सगळ्या भारताचे लक्ष राहील, हे निश्चित! ३६५ गेल्या ३६५ दिवसातील देवेंद्र फडणवीस यांच्या दैनंदिनीतील पाने पाहिली तर त्यातील अर्धे दिवस उद्योगांशी करार मतदार करण्यात गेलेले दिसतात. त्याच वेळी दुष्काळी भागात पाणी पोहोचवणार्या नदीजोड योजनेचेही काम ते मार्गी लावताना दिसतात.