

Rohit Pawar on PM Modi
मुंबई: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. १०) देशवासीयांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत संयमाने करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी इंधन बचतीवर भर दिला असून विरोधकांनी मात्र त्यांच्या आवाहनानंतर सरकारवरलाच धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सरकारवर टीका केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "तेल कमी खा, पेट्रोल-डिझेल जपून वापरा, असा काटकसर करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी देशाला दिला आहे. आजच्या युद्धजन्य परिस्थितीत हा सल्ला योग्य असला तरी याची सुरवात केंद्र सरकारने स्वतःसह देशातील सर्व भाजपशासीत राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल."
"आता भाजपाने टार्गेट ठेवलेल्या राज्यातील निवडणुका तर झाल्या आहेत, त्यामुळे ‘निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करु नका’ असं आता म्हणता येणार नाही, पण ठराविक राज्यातील बड्या कंत्राटदारांना हाताशी धरून दलाली खाऊ नका, भ्रष्टाचार करु नका, उधळपट्टी करु नका, अनावश्यक वाहनांचा ताफा घेऊ नका, अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करु नका, हे भाजपशासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला आधी सांगण्याची गरज आहे. असं केलं तर कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही," असा सल्ला त्यांनी सरकारला दिला आहे.
"महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अडचणीत येऊ नये यासाठी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सहमतीने परराष्ट्र धोरण आखले तर सरकारवर कुणी टीकाही करणार नाही आणि देशही अडचणीत येणार नाही. आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचे आवाहन म्हणजे, पेट्रोल-डिझेल दरवाढीचे संकेत तर नाहीत ना, अशीही शंका येते," असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात परदेशी चलनाचा साठा भरपूर असणे आवश्यक असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला येत्या वर्षभरात सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. सोने खरेदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन खर्च होत आहे. त्यामुळे कोणताही समारंभ असला तरी सोन्याचे दागिने खरेदी करू नका, असे ते म्हणाले. एकेकाळी लोक देशासाठी सोने दान करीत असत, आज दान करण्याची गरज नसली तरी वर्षभर सोने खरेदी टाळा, यातच देशाचे हित आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले