

मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर डेंग्यूसारख्या आजारांमुळे प्लेटलेट्स आणि रक्तघटकांची मागणी वाढण्याची वेळ आली असतानाच केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. रक्तघटक तयार करणारे यंत्र बंद पडले आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत प्लेटलेट्स व फ्रोजन प्लाझ्मानिर्मिती जवळपास ठप्प झाली आहे. त्यातच रक्तसाठाही अत्यल्प असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे.
मे २०२६ मध्ये रक्तपेढीत एकही रँडम डोनर प्लेटलेट (आरडीपी), सिंगल डोनर प्लेटलेट (एसडीपी) किंवा फ्रोजन प्लाझ्मा तयार करण्यात आले नाही. या काळात ५४२ पॅक्ड रेड सेल युनिट्स इतर सरकारी रक्तपेढ्यांकडून घेण्यात आले, तर सुमारे ५०० युनिट्स खासगी स्रोतांमधून उपलब्ध करून घ्यावे लागले. एप्रिलमध्येही केवळ १२ आरडीपी तयार झाले, तर एसडीपी निर्मिती शून्य होती.
मार्च २०२६ मध्ये मात्र सुमारे ५०० आरडीपी आणि १,००० फ्रोजन प्लाझ्मा युनिट्स रुग्णांना वितरित करण्यात आले होते. त्यामुळे या रक्तघटकांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट होते. असे असतानाही गेली दोन निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.
केईएम रक्तपेढीत २८ तंत्रज्ञ आणि दोन तांत्रिक पर्यवेक्षक कार्यरत आहेत. एवढे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही रक्तघटक निर्मिती दीर्घकाळ ठप्प राहणे आणि रक्तसाठा कमी होणे याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांची सज्जता हा सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
सरकारी रक्तपेढीत प्लेटलेट्स आणि फ्रोजन प्लाझ्मा सुमारे ३०० रुपयांत उपलब्ध होतात. मात्र रक्तघटक निर्मिती बंद पडल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रक्तपेढ्यांतून हे घटक विकत घ्यावे लागतात. अशावेळी एका पिशवीसाठी ४०० ते ७०० रुपये मोजावे लागतात.
केवळ ७७ युनिट्सचा रक्तसाठा
सध्या केईएम रक्तपेढीत उपलब्ध रक्तसाठ्यानुसार ए पॉझिटिव्ह २४, ए निगेटिव्ह २, बी पॉझिटिव्ह १२, बी निगेटिव्ह १, एबी पॉझिटिव्ह १५, एबी निगेटिव्ह २, ओ पॉझिटिव्ह २१ आणि ओ निगेटिव्ह एकही युनिट उपलब्ध नाही. सर्व गट मिळून केवळ ७७ युनिट्सचा साठा उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे केईएममध्ये दररोज सुमारे १०० रक्तपिशव्यांचे वितरण होते. त्यामुळे उपलब्ध साठा एका दिवसाच्या गरजेपेक्षाही कमी आहे,तर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाच्या रक्तपेढीतही रक्तसाठा अत्यल्प आहे. तेथे ए पॉझिटिव्ह ३, बी पॉझिटिव्ह ३, एबी पॉझिटिव्ह १ आणि ओ पॉझिटिव्ह ६ असे मिळून अवघे १३ युनिट्स उपलब्ध आहेत. प्रसूती आणि अपघातग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता हा साठा धोक्याच्या पातळीवर असल्याची चर्चा आहे.
केईएम रुग्णालयातील रक्तपेढीतील मशीन लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत वापरात असलेली मशीन १० ते १२ वर्षे जुनी असल्याने ती वारंवार बंद पडण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रक्तपेढीची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्यासाठी नवीन मशीन खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे.
डॉ. हरीश पाठक, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय