Sindhudurg News : सिंधुदुर्गात ११० दरडप्रवण तर ५३ पूर

पावसाळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज; ३२ ग्रा.पं.ना आपत्ती प्रतिसाद किट्स प्रदान
Sindhudurg News
सिंधुदुर्गात ११० दरडप्रवण तर ५३ पूर
Published on
Updated on

अजित सावंत

कणकवली : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारणासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ, दरडी कोसळणे, वीज पडणे, आग यासारख्या संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात ५३ पूर बाधित गावे असून ११० दरडप्रवण गावे आहेत. या गावांवर विशेष लक्ष ठेवतानाच जिल्ह्यातील आपत्तीच्या अनुषंगाने ८९९ इतके मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यात आले आहे. प्रत्येक विभाग, तालुकास्तर आणि ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले आहेत. पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती निवारण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींसह सर्व विभागांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत-परूळेकर यांनी दिली.

सिंधुदुर्गात १४ वर्षांचे सरासरी पर्जन्यमान ३,४६८.३८ मी.मी. आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, दरडी कोसळणे यासारख्या संकटांचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात दोडामार्ग-११, वेंगुर्ले-६, सावंतवाडी-९, कुडाळ-५, मालवण-६, देवगड-४, कणकवली-६, वैभववाडी-६ अशी ५३ पूर बाधित गावे आहेत. तर दोडामार्ग १३, सावंतवाडी -१५, वेंगुर्ले-१२, मालवण -९, कणकवली-१३, देवगड-१७, वैभववाडी -१२ अशी ११० दरडप्रवण गावे आहेत. त्यामूळे अशा गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये एनडीआर पथक- २०, (१ जूलै ते ३० सप्टेंबर) आपदामित्र -२००, युवाआपदामित्र -६६, गृहरक्षक -१३९, नागरी संरक्षण स्वयंसेवक -४३४, आंबोली व सांगेली रेस्क्यू ग्रुप-२०, सह्यादी जीव रक्षक करूळ-२०, जय बालाजी रेस्क्यू ग्रुप मालवण-१० असे ८९९ मनुष्यबळ उपलब्ध आहे. जिल्ह्यात १०१८ लाईफ जॅकेट्स, ६१३ लाईफ बोया, ३७ बोट, १३ रोबोटिक वॉटरक्राफ्ट, १२६ स्ट्रेचर, ८७ सेफ्टी रोप्स, १३ टेंट, १५ सॅटेलाईट फोन, ६८ वॉकी टॉकी उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात ४३३ ग्रा.पं. असून ४३३ ग्रामआपत्ती व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. यापैकी ३२ ग्रा.पं. ना रेस्क्यू किट्स देण्यात आले आहेत. तर सह्याद्री ॲडव्हेचर आंबोली, सांगेली या रेस्क्यू टिमला ६६ लाखांचे विविध प्रकारच्या साहित्याचे रेस्क्यू किट्स जिल्हानियोजनमधून देण्यात आले आहे. पोलिस यंत्रणेनेही जिल्हा आणि पोलिस स्टेशनस्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. तर महावितरणनेही जिल्हा स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे. मागील पावसाळ्यात १३०० पोल पडले होते. त्या पार्श्वभूमीवर ८०२० पोलचे टेंडर प्रोसेसमध्ये असून ७१४ डिस्ट्रीब्युशन बॉक्स दुरुस्त करण्यात आले. उर्वरीत ६०० बॉक्सची कार्यवाही सूरू आहे. आरोग्य विभागाची जिल्हा आणि प्रत्येक तालुकास्तर अशी

९ वैद्यकीय मदत पथके आणि जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक प्रा. केंद्रात एक असे ३९ कक्ष स्थापन केले आहेत. कोकण आपत्ती सौमीकरण प्रकल्पांतर्गत धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची १८ कामे मंजूर होती तर त्यातील २ कामे मंजूर तर ४ कामे प्रगतीपथावर आहेत. तर खारभूमी बंधाऱ्याची ३ कामे पूर्ण तर १६ कामे प्रगतीत आहेत. तर एसटी महामंडळाचे नियंत्रण कक्षही कार्यरत झाले आहेत. कोकण रेल्वेचे ६ धोकादायक कटींग असून सर्व कटींगमध्ये दिवसरात्र वॉचमन तैनात केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news