

मुंबई : बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत इतर चार जणांचाही दुर्दैवी अंत झाला. यातीलच एक नाव म्हणजे फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी. हा अपघात जितका भयानक आहे, तितकीच पिंकीची कहाणी हृदय पिळवटून टाकणारी. पिंकी माळी ही मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूर (भैंसा गाव, केराकत तहसील) येथील रहिवासी होती.
गेल्या 5 वर्षांपासून ती एव्हिएशन क्षेत्रात क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती. तिने याआधीही राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांसारख्या अतिविशिष्ट व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) विमानात सेवा बजावली होती. अजितदादांसोबत तिचा हा चौथा प्रवास होता. तिचे वडील शिवकुमार माळी हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि तिचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
तिचे वडील राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते असल्याने त्यांना अजित पवार यांच्याशी बोलण्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वीच प्रवासादरम्यान पिंकीने वडिलांचे अजितदादांशी बोलणे करून देण्यासाठी फोन लावला होता, पण त्यावेळी वडिलांनी फोन उचलला नाही. म्हणून, आजच्या प्रवासात अजितदादांशी तुमचे नक्की बोलणे करून देते, असे वचन तिने वडिलांना दिले होते. आज वडील त्या फोनची वाट पाहत होते.
रोज न चुकता मेसेज करणारी पिंकी आज शांत होती. तिचा फोन आला नाही, पण टीव्हीवर अपघाताची बातमी आली आणि माळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. वडिलांचे अजितदादांशी बोलणे तर राहून गेलेच, पण आपली लेक आता पुन्हा कधीच हॅलो म्हणणार नाही, हे सत्य पचवणे त्या बापासाठी सर्वात कठीण झाले आहे.