

मुंबई : भारत आणि युरोपियन युनियन (ईयू) मध्ये झालेल्या व्यापार कराराचे सकारात्मक पडसाद सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांत सलग दुसऱ्या सत्रात तीन अंकी वाढ झाली.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 487 अंकांनी वाढून 82,344 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 167 अंकांनी वाढून 25,342 अंकांवर गेला. गत दोन सत्रांत मिळून सेन्सेक्स 800 अंकांहून अधिक आणि निफ्टी निर्देशांकात 293 अंकांनी वाढ झाली आहे. बीएसईतील गुंतवणूकदारांनी सहा लाख कोटी रुपयांची कमाई केली. तर, बीएसईतील नोंदित कंपन्यांचे बाजारमूल्य 454 वरून 460 लाख कोटी रुपयांवर गेले.
निफ्टी-50 निर्देशांकातील 32 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बेल)च्या शेअरने 9.21 टक्क्यांनी आणि ओएनजीसीने 9.18 टक्क्यांनी उसळी घेतली. कोल इंडियाच्या शेअर भावात 5.27 टक्क्यांनी वाढ झाल्याने निफ्टी वधारला. टाटा कंझ्यूमर निर्देशांक 4.55, एशियन पेंटस् 4.22 आणि मारुती सुझुकी इंडियाच्या शेअर भावात 2.39 टक्क्यांनी घसरण झाली.