

मुंबई: नवे फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आता पहिल्या दिवसापासून आवश्यक संख्येतील नियमित पूर्णवेळ शिक्षक आणि निर्धारित पायाभूत सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रयोगशाळा, उपकरणे, वर्गखोल्या, ग्रंथालय यांसह आवश्यक शैक्षणिक सुविधा नसतील, तर संबंधित संस्थेला मान्यता दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करण्यासाठी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) मान्यता प्रक्रियेत हे कडक निकष लागू केले आहेत.
नव्या महाविद्यालयांना अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर वर्षनिहाय शिक्षकवर्ग आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची मुभा होती. मात्र, काही संस्थांनी मान्यता मिळाल्यानंतरही निर्धारित निकष पूर्ण केले नाहीत.
त्यामुळे शिक्षकांची कमतरता तसेच प्रयोगशाळा आणि अन्य सुविधांचा अभाव राहिला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पीसीआयने ही पद्धत बदलली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने २९ मे २०२६ रोजी मान्यतेसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पीसीआयच्या केंद्रीय परिषदेच्या बैठकीत सुधारित निर्देश जारी करण्यात आले. त्यानुसार अभ्यासक्रम आणि मंजूर प्रवेश क्षमतेनुसार आवश्यक शिक्षकवर्ग व पायाभूत सुविधांची पूर्तता महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच करावी लागणार आहे.
शिक्षकांच्या बाबतीत केवळ संमतीपत्रे किंवा नियुक्तीची कागदोपत्री पूर्तता ग्राह्य धरली जाणार नाही. संबंधित पदांवर नियमित पूर्णवेळ शिक्षक असणे आवश्यक असून, त्यांच्याकडे पीसीआयने निश्चित केलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असावा लागेल.
शिक्षकांची पात्रता, अनुभव, पदनाम, कामाचे स्वरूप आणि कार्यभारासंदर्भातील विद्यमान अटी कायम ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रयोगशाळा, उपकरणे, वर्गखोल्या, प्रशासकीय सुविधा, ग्रंथालय आणि विद्यार्थ्यांसाठीच्या अन्य निर्धारित सोयी अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वीच तयार ठेवाव्या लागतील.
दिशाभूल करणाऱ्या संस्थेवर होणार कारवाई
‘आधी मान्यता आणि नंतर सुविधा’ या पद्धतीला आता पूर्णविराम मिळणार आहे. शिक्षकवर्ग किंवा पायाभूत सुविधांबाबत चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती किंवा कागदपत्रे सादर केल्यास संबंधित संस्थेवर कारवाई केली जाणार आहे. फार्मसी कायदा, १९४८, लागू नियमावली आणि पीसीआयच्या निकषांनुसार ही कारवाई होईल. त्यामुळे कागदोपत्री पूर्तता दाखवून मान्यता मिळविण्याच्या प्रयत्नांना आळा बसणार आहे.