

Parth Pawar VSR Aviation flight travel: राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांनी VSR एव्हिएशन कंपनीच्याच विमानातून प्रवास केल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. अजित पवार यांचा याच कंपनीच्या विमानात बसलेले असताना दुर्दैवी अपघात झाला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या विरोधात रान उठवलं आहे. त्यांनी या कंपनीवर बंदी घालण्याची मागणी केली असून यासाठी ते गल्ली ते दिल्ली जोर लावत आहे.
असं असताना दुसरीकडं अजित पवार यांचे ज्येष्ठ सुपूत्र पार्थ पवार हे याच विमानातून मुंबई ते पुणे असा प्रवास करतात त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसणे स्वाभाविक आहे. यावर आता खासदार पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
पार्थ पवार यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिलं की, 'मोदीबाग पुणे इथं पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहचायचं होतं. त्यामुळं मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळं नकळतपणे VSR एव्हिएशन कंपनीचं विमान बूक झालं.'
दरम्यान, पार्थ पवार यांनी प्रशासकीय यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विमानतळावर पोहचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत मला हे विमान VSR कंपनीचं होतं याची कल्पना नव्हती. ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तात्काळ रद्द करतोय असं सांगितलं.
पार्थ पवार यांनी आमची VSR कंपनीबाबतची पूर्वीची भूमिका आजही कायम आहे. आमचा याला स्पष्ट विरोध आहे. पुढेही तसाच राहील असं स्पष्टीकरण देखील दिलं.
शरद पवार यांनी पवार कुटुंबीयांसाठी पुण्यातील आपल्या निवासस्थानी डिनरचे आयोजन केले होते. नुकतेच ते रूग्णालयात उपचार घेऊन परतले आहेत. या भेटीसाठी पवार कुटुंबीय पुण्यात दाखल झाले होते.
दरम्यान, रोहित पवार यांनी नुकतेच पुन्हा एकदा VSR कंपनीविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी दावा केला की ज्या दिवशी अजित पवार यांचा अपघात झाला त्या दिवशी व्हीएसआर कंपनीला काही कोटी रूपये मिळाले. मग ही अपघाताची बक्षिसी होती का अशी आरोप वजा विचारणा केली आहे.