Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांच्याविरोधात पवारांचे ‌‘भावबंधन‌’

अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप रोहित पवार सातत्याने करत आहेत.
Sunil Tatkare News
Sunil Tatkare NewsPudhari
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या वर्चस्वयुद्धात माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पार्थ, जय आणि रोहित हे तिसऱ्या पिढीतील पवार एकत्र आले आहेत. अजित पवार यांना कायम साथ देणारे तटकरे यांनी आमदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे सुरू केले, असा पार्थ पवार गटाचा संशय आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदच्युत केले असावे असा अंदाज आहे.

अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा आरोप रोहित पवार सातत्याने करत आहेत. त्यांनी संशयाची सुई पटेल, तटकरे यांच्याकडे वळवली असतानाच आता तटकरे यांना पदच्युत करणारे निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र बाहेर कसे आले? त्यामागे पार्थ आणि रोहित यांचे संगनमत आहे अशी माहिती एका तटकरे समर्थकाने दिली.

Sunil Tatkare News
Train Accident Compensation: प्रवाशाची चूक असली तरी जबाबदारी रेल्वेचीच; हायकोर्टाचा निर्वाळा

पत्र बाहेर कसे पडले: तटकरे

पत्र बाहेर कसे पडले हे विचारण्यासाठी शुक्रवारी तटकरे यांनी कार्यालय प्रमुख परिषद सदस्य शिवाजीराव गर्जे यांना प्रश्न विचारला अशी चर्चा आहे. गर्जे यांनी आपला तटकरे यांच्याशी कायम संवाद असतो असे सांगत अधिक काही बोलण्यास नकार दिला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र पार्थ यांच्या सांगण्यामुळे जाहीर झाले असा ठपका गर्जेंवर ठेवण्यात आला आहे.

पटेल, तटकरे यांची पकड कमी करण्यासाठी पत्र फोडल्याचा आरोप

खासदार पार्थ पवार यांनी रोहित पवार यांची मदत घेतल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र दोन महिन्यांनंतर अचानक उगवण्यामागे तटकरे आणि पटेल यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील पकडीला कमी करण्यासाठी पवारांच्या तरुण पिढीने चालवलेले प्रयत्न आहेत.

Sunil Tatkare News
Oman Ship Attack: ओमानमध्ये ठार झालेल्या मुलाचे पार्थिव मायदेशी आणा; पित्याची मुंबई उच्च न्यायालयात धाव

या पक्षावर मराठा समाजाची पकड राहायला हवी. व्यापारी आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या दावणीला हा पक्ष बांधला गेला तर अजित पवार यांना मानणारे कित्येक मतदार दूर जातील अशी भीती पार्थ, जय आणि रोहित पवार यांच्या मनात असल्याची चर्चा आहे.

वादळ शमविण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला आपल्याकडे वळवतील अशी भीती अजित पवार यांच्या कुटुंबाला वाटते असे एका निकटवर्तीयाने सांगितले. सुनील तटकरे यांनी पक्षासाठी प्रचंड मोठे काम केले आहे, असे पार्थ पवार यांनी म्हटले असले तरी ते चहाच्या पेल्यातील वादळ शमवण्याचा अधिकृत प्रयत्न होता. प्रत्यक्षात सुनील तटकरे यांची पक्षावरील पकड कमी करणे गरजेचे असल्याचे पवार कुटुंबीयांना वाटते.

सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात तटकरे दूरच

यासंदर्भात सुनील तटकरे यांना दिल्ली दौऱ्यातून दूर ठेवले. सुनेत्रा पवार या राज्यसभेत गेल्या असताना लोकसभेतील एकमेव सदस्य असलेल्या अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी तेथे नसणे हा मोठा संकेत मानला जातो आहे. तटकरे हे अजित पवार यांचे जीवाभावाचे मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांनी पक्षावर वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका अजित पवार यांच्या कुटुंबीयांना आहे.

तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर आमदारांची नाराजी

आमदारांशी संपर्क साधताना सुनील तटकरे स्वतःला केंद्रस्थानी मानत असल्याची तक्रार अजित पवार यांना मानणाऱ्या पुण्यातील काही आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्याची खात्रीलायक माहिती आहे. या नाराजीचा वेध घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी अनौपचारिक बैठक बोलावली होती. या बैठकीत तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या काही आमदारांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्या असे समजते.

राष्ट्रवादीचे ते पत्र बाहेर आलेच कसे?

तटकरे हे अजित पवार यांच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचे मित्र असल्याने सुनेत्रा पवारांना त्यांना नाराज करायचे नाही, मात्र आपल्या निर्णयानुसार पक्ष चालेल, हेही त्यांना दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पद नसलेले पत्र आयोगाला पाठवले गेले. हे पत्र राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लिपिक वगळता अन्य कुणालाही माहीत असण्याची शक्यता नाही. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या संमतीने तयार झालेले हे पत्र अचानक समोर आले कसे आणि तो मुद्दा रोहित पवार यांनी उचलला कसा याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news