

पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीत उभारलेल्या विविध संकल्पनात्मक मतदान केंद्रांनी यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विशेष लक्ष वेधून घेतले आहे. मतदारांचा सहभाग वाढवणे, मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे व लोकशाही प्रक्रियेला उत्सवाचे स्वरूप देणे, या उद्देशाने हरित मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र तसेच पिंक मतदान केंद्रांची उभारणी केली होती.
या मतदान केंद्रांमध्ये पर्यावरणपूरक आणि सौंदर्यपूर्ण सजावटीवर विशेष भर दिला होता. हरित मतदान केंद्रांमध्ये झाडे, रोपे, फुलांची सजावट, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक तसेच प्लास्टिकमुक्त साहित्याचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हे केंद्र मतदारांसाठी केवळ मतदानाचे ठिकाण न राहता पर्यावरण जागृतीचे प्रतीक ठरले. अनेक मतदारांनी या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरणपूरक संकल्पना राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
आदर्श मतदान केंद्रांमध्ये स्वच्छता, सुव्यवस्थित रचना, स्पष्ट दिशादर्शक फलक, बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार तसेच महिलांना कोणताही त्रास न होता मतदान करता आले. पिंक मतदान केंद्रांत महिलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले असून, महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षितता आणि सोयीसुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले होते.
या सर्व मतदान केंद्रांवर केलेली आकर्षक सजावट ही मतदारांसाठी उत्सुकतेचा व आनंदाचा विषय ठरली. अनेक ठिकाणी उभारलेले सेल्फी पॉइंट्स मतदारांचे विशेष आकर्षण ठरले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांनी या सेल्फी पॉइंट्सवर छायाचित्रे काढून सोशल मीडियावर शेअर करत लोकशाही उत्सवात आपला सहभाग नोंदवला.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी हरित मतदान केंद्रांचे स्वागत केले असून, अशा उपक्रमांमुळे मतदानाचा अनुभव सुखद झाल्याची भावना व्यक्त केली. एकूणच, मतदारांना आकर्षित करण्यासाठी व मतदान प्रक्रियेला सुलभ, समावेशक व आनंददायी बनवण्यासाठी पनवेल मनपाने राबविलेल्या उपक्रमांची सर्वत्र चर्चा होत आहे.