महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘पंच्याहत्तरीतील माझा भारत’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘पंच्याहत्तरीतील माझा भारत’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईतील गांधी फिल्म फाऊंडेशनने आयोजित केलेल्या 'पंच्याहत्तरीतील माझा भारत' या चित्रकला स्पर्धेचे महाराष्ट्राच्या कला विश्वावर व्यापक परिणाम संभवतात. त्यातील एक परिणाम म्हणजे राज्याच्या कानाकोपर्‍यातील चित्रकारांना मुंबईतील 'गांधी फिल्म्स फाऊंडेशन आर्ट गॅलरी'चे दरवाजे सदैव उघडे असतील.

मुंबईत ज्या मोजक्या आर्ट गॅलरीज आहेत त्यात जहांगीरसारख्या आर्ट गॅलरीसाठी कलावंतांना पाच-पाच वर्षे थांबावे लागते. एकदाची तारीख मिळाली तरी होणारा खर्च हा अत्यंत जड म्हणावा असा असतो. महाराष्ट्रात साधारणत: दीडशे कला महाविद्यालये आहेत. त्यातील 50 ते 60 कला महाविद्यालये कुठेही नाव घ्यावे अशी आहेत. या महाविद्यालयांत शिकणार्‍या मुलांना मुंबईत आर्ट गॅलरी सहसा मिळत नाही. अशा उमद्या कलावंतांना यापुढे नाममात्र खर्चात 'गांधी फिल्म्स फाऊंडेशन आर्ट गॅलरी' आता उपलब्ध होईल. गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रथमच ही गॅलरी अशा कलावंतांना स्पर्धेच्या निमित्ताने निमंत्रित करू पाहात आहे.

मुंबईच्या कलाविशारदच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 'पंच्याहत्तरीतील माझा भारत' चित्रकला स्पर्धेत इच्छुक कलावंतांनी 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आपली पेंटिंग्ज जमा करायची आहेत. पेंटिंगचा आकार 3 बाय 3 असावा. स्पर्धेत निवडण्यात आलेल्या पेंटिंगचे जाहीर प्रदर्शन 2 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान 'गांधी फिल्म्स फाऊंडेशन आर्ट गॅलेरी मध्ये प्रदर्शन भरवण्यात येईल. देशभरातील कला विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी ही स्पर्धा खुली असून, या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गांधी फिल्मस फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन पोतदार यांनी केले आहे.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news