

नवी मुंबई: राजेंद्र पाटील
नवी मुंबई महापालिकेत तेरावे महापौर म्हणून सुजाता पाटील यांची निवड झाली. मात्र या निवडीमुळे सत्ताधारी भाजपमधील महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या नगरसेविकांमध्ये सभागृहात नाराजी दिसून आली. माधुरी सुतार महापौरपदी वर्णी लावण्यासाठी थेट पक्षश्रेष्ठींकडे गेल्या होत्या. पक्षश्रेष्ठींकडून दबाव आणण्याचा केलेला प्रयत्न त्यांना महाग पडला असून स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांचा पत्ता कट केला. आणि भाजपच्या बंद लिफाफ्यात महापौर पदासाठी मंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक नगरसेवक सुरज पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील यांची लॉटरी लागली.
29 जानेवारीपर्यंत भाजपकडून महापौर पदासाठी नगरसेविका माधुरी सुतार, भाजपच्या 36 नगरसेविकांपैकी रेखा म्हात्रे, सलूजा सुतार, अदिती नाईक, अंजनी भोईर, दयावती शेवाळे, नेत्रा शिर्के, वैष्णवी नाईक , शुभांगी पाटील, ॲड. भारती पाटील या महिला नगरसेविका महापौरपदाच्या प्रमुख दावेदारांच्या यादीत होत्या. यापैकी माधुरी सुतार, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील या आघाडीवर होत्या. पाटील आणि शिर्के यांनी स्थायी समिती सभापतीपदाची धुरा सांभाळली होती. अनुभवी, संघटनात्मक बांधिलकी असलेल्या आणि जनतेमध्ये कामाचा ठसा उमटवलेल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र यादीत नगरसेविका सुजाता पाटील यांचे नाव नव्हते.
30 जानेवारीला भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक यांच्यात महापौरपदाबाबत बैठक झाली होती. या बैठकीत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, संदीप नाईक, सागर नाईक आणि संजीव नाईक याच्यांत झालेल्या प्राथमिक बैठकीचा अहवाल मंत्री नाईक यांना दिला होता. बैठकीत एकूण 36 महिला नगरसेविकांपैकी नऊ नगरसेविकांची यादी स्थानिक भाजप कमिटीने तयार केली होती. या यादीत गणेश नाईक हे आणखी दोन नवीन नावांचा समावेश करतील अशी माहिती त्यावेळी भाजप निवडणूक प्रमुख संजीव नाईक यांनी दिली होती. यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत 11 महिला नगरसेविका होत्या.
प्रदेश भाजपने आमदार विक्रांत पाटील निरीक्षक यांच्याकडे 36 महिला नगरसेविकांची सविस्तर तपशील आणि माहिती देण्याचे निर्देश नवी मुंबई निवडणूक प्रमुख संजीव नाईक यांना दिले होते. त्यानुसार नाईक यांनी ही माहिती निरीक्षकांकडे दिली होती. मात्र या अहवालात 11 महिला नगरसेविकांमध्ये महापौर सुजाता पाटील यांचे नाव नसल्याची चर्चा आज महापौर निवडणुकीनंतर सभागृहात रंगली होती. ऐनवेळी नगरसेविका सुजाता पाटील यांचे नाव पुढे आले. निमित्त होते ते म्हणजे महापौरपदावर वर्णी लागावी यासाठी राजकीय दबाव आणून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न माधुरी सुतार यांनी केल्याची राजकीय चर्चा महापालिका सभागृहात रंगली होती.
गणेश नाईकांना डोईजड होण्याचा प्रयत्न केल्याने सुतार यांचे महापौरपद हुकले, असे भाजपच्या काही नाईक निष्ठावान नगरसेवकांनी सांगितले. महापौर निवडणुकीदरम्यान नगरसेविका माधुरी सुतार आणि नेत्रा शिर्के यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. डोक्यावर बांधलेले फेटे उतरून या नगरसेविका सभागृहात भाजप गटाच्या बाकावर बसून होत्या.
महापौर निवडणूक होताच सभागृहात नाईक परिवारातील संजीव नाईक, संदीप नाईक आणि सागर नाईक यांनी एकत्र सभागृहात येत आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. महापौरांसोबत राहून फोटोसेशन केले.यावेळी अनेकांचे लक्ष वेधून घेत महापौर आणि उपमहापौर यांना खुर्चीवर बसविण्यासाठीही नाईक कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.