Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळाची झेप; अवघ्या 19 दिवसांत 1 लाख प्रवासी
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानंतर पहिल्या 19 दिवसांमध्येच 1 लाख प्रवाशांचा आकडा पार केला. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, सुटसुटीत सेवा आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे विमानतळाने अल्पावधीतच विश्वासार्हतेची उंची गाठली आहे. विशेष म्हणजे, या 19 दिवसात 22 मेट्रीक टन मालाची हाताळणी झाल्याने कार्गो टर्मिनलचा शुभारंभ झाला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक उड्डाणे सुरू केल्यानंतर 12 जानेवारी 2026 पर्यंत 1 लाख 9 हजार 917 प्रवाशांची नोंद झाली असून, यामध्ये 55 हजार 934 आगमन करणारे तर 53 हजार 983 प्रस्थान करतारे प्रवासी आहेत. 10 जानेवारी 2026 हा दिवस विमानतळासाठी सर्वाधिक वर्दळीचा ठरला. एका दिवसात तब्बल 7 हजार 345 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.
या कालावधीत 40 हजार 260 आगमन करणाऱ्या बॅगा आणि 38 हजार 774 प्रस्थान करणाऱ्या बॅगांचे यशस्वी व्यवस्थापन करण्यात आले. यामुळे प्रवाशांचा वेळ व श्रम वाचून प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर झाल्याचा दावा विमानतळ प्रशासनाने केला आहे. मालवाहतुकीच्या आघाडीवरही विमानतळाने सकारात्मक सुरुवात केली असून, 22.21 टन मालाची हाताळणी करण्यात आली आहे. माल वाहतूकीसाठी दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू ही प्रमुख जोडणी केंद्रे ठरली असून, यामुळे देशांतर्गत संपर्क मजबूत होत आहे.
सुरक्षितता आणि दर्जेदार सेवांवर भर
आधुनिक सुविधा, सुटसुटीत प्रक्रिया, सुरक्षितता आणि दर्जेदार सेवांवर भर देत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टप्प्याटप्प्याने सेवा विस्तारत आहे. अवघ्या 19 दिवसांत मिळालेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद हीच विमानतळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक गगनभरारी ठरला आहे.

